सांगली : सांगली येथे महापालिकेच्या निवडणुकीचा ज्वर वाढला असतानाच मिरजेत अनेक दुकाने, संस्थांनी राजकारणावर न बोलण्याविषयीच्या सूचनांचा फलक झळकविला आहे. एकीकडे राजकीय चर्चेचा पूर, तर दुसरीकडे चर्चेची अॅलर्जी असे चित्र दिसून येत आहे. राजकारणाविषयी अनेकांना उत्सुकता असते.
अशावेळी अनेक पैजाही लागतात. निवडणुकीच्या काळात खरतर अनेक घडामोडींनाही ऊत येतो. यावेळी नको ते धाडस कार्यकर्त्यांकडून केले जाते. यातूनच राजकीय वाद विवाद होतात. त्यामुळे निवडणूक व राजकारण काही दिवसांपुरतेचे असले तरी त्याचे साद पडसाद अनेक दिवस उमटतात. यामुळेच की काय येथील एका दुकानात राजकारणावर बोलू नये असा फलक लावून राजकारणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. सांगली-मिरजेत निवडणूकीचे वातावरण तापले असल्यानेच असे वैविध्यपूर्ण फलक लावलेले दिसून येत असून त्याविषयी गंमतीदार चर्चा ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष तसेच सोशल मिडीयावर सुरु असल्याचे दिसून येत आहे.