सांगली : सांगलीकरांच्या पाचवीला पूजलेल्या शेरीनाल्याचे सांडपाणी पुन्हा एकदा कृष्णा नदीत मिसळू लागले आहे. अमरधाम स्मशानभूमीजवळ शेरीनाल्याचे पाणी वाहून नेणारी गटार फुटल्याने कृष्णेच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर, संजय चव्हाण, नितीन चव्हाण यांनी गुरुवारी शेरीनाल्याची पाहणी करून प्रशासनाच्या कारभाराचा पंचनामा केला.
शेरीनाल्यातील सांडपाणी धुळगाावमधील शेतीला देण्याची योजना राबविण्यात आली. पण ही योजना आता फोल ठरली आहे. कृष्णा नदीकाठी बंधारा बांधून तेथून तीन मोटारीद्वारे सांडपाणी उचलण्यात येत होते; पण गेल्या वर्षभरापासून एक मोटार नादुरुस्त आहे. मोटार दुरुस्तीचा मुहूर्त प्रशासनाला लागलेला नाही. त्यात काही दिवसांपूर्वी दुसरी मोटार बंद पडली. एकाच मोटारीद्वारे सांडपाण्याचा उपसा सुरू होता. आता मोटारी दुरूस्त करून पुन्हा शेरीनाल्याचे सांडपाणी उचलून सांगली बंधाऱ्यापुढे सोडण्यात येत आहे.
हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी विष्णू घाटापर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तेथून मोठी गटार काढून त्यात पाणी सोडले जाते. हीच गटार फुटली असून, शेरीनाल्याचे पाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे आयर्विन पूल ते विष्णू घाट, अमरधाम घाटमार्गे संपूर्ण सांडपाणी नदीत फेसाळून मिसळत होते. त्यात नदीत वाहते पाणी नाही. बंधाºयात पाणी अडविले असून, त्याच पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याने नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे.
महापालिका प्रशासनाकडून शेरीनाल्याच्या पलीकडेच कर्नाळ रस्त्यावरील जॅकवेलपासून पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे शहराला दूषित पाणी मिळत नसल्याचा दावा केला जातो. परंतु गुरुवारी संपूर्ण सांडपाणी परतीच्यामार्गे जॅकवेलपर्यंत पसरल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा सांगलीकरांना हेच गटारगंगेचे पाणी पाजले जात असल्याचा आरोप उत्तम साखळकर यांनी केला.
सतीश साखळकर म्हणाले, एकीकडे शेरीनाला थेट कृष्णेत मिसळून प्रदूषण वाढत आहे. दुसरीकडे स्टेशन चौकात ड्रेनेज तुंबून शहरात गटारगंगा निर्माण होऊ लागली आहे. तरीही महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा डांगोरा पिटला जात आहे. ही गटारगंगा म्हणजे महापालिकेच्या कारभाराचा आरसा आहे. त्याबाबत प्रशासनाला गांभीर्य नाही. ड्रेनेज अभियंता पंधरा दिवस रजा टाकून गायब आहेत. सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या नेत्यांनाही याचे गांभीर्य दिसून येत नाही.अधिकाºयांना सांडपाणी पाजू : साखळकरविरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले की, शेरीनाल्याचे पंप सुरू करून लाखो रुपयांचा विजेचा बोजा तिजोरीवर टाकला जात आहे. शहरात दूषित पाणीपुरवठा होऊ लागला आहे. परंतु याकडे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी, महापालिकेच्या अधिकाºयांचे जराही लक्ष नाही. मिरजेप्रमाणे गॅस्ट्रोची साथ पसरून नागरिकांचे बळी गेल्यावर यंत्रणा जागी होणार आहे. येत्या दोन दिवसांत महापालिका प्रशासनाने उपाययोजना केल्या नाहीत तर, हेच सांडपाणी अधिकाºयांना पाजणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
अमरधाम स्मशानभूमीजवळ शेरीनाल्याचे पाणी वाहून नेणारी गटार फुटल्याने कृष्णेच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे नदी परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.