धुवॉँधार फलंदाजी करून सांगली जिल्ह्याचे नाव राज्यभर करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाची अव्वल खेळाडू आणि महाराष्ट्राची आघाडीची फलंदाज स्मृती श्रीनिवास मानधना हिची आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. ती मूळची सांगलीशेजारच्या माधवनगरची. अष्टपैलू खेळीने स्मृतीने अनेक सामने गाजवले आहेत. धावांचे डोंगर रचले. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारी ती सांगलीची एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. क्रीडानगरी सांगलीचे नाव सातासमुद्रापार नेताना तिचा प्रवास कसा झाला, भारतीय क्रिकेट संघातील तिचे अनुभव, मुलींना क्रिकेटमध्ये उपलब्ध असलेल्या संधी, मुलींचा क्रिकेटमधील सहभाग यांसह विविध विषयांवर स्मृती मानधना हिने ‘लोकमत’शी साधलेला हा दिलखुलास संवाद...आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तुझी तयारी कशी सुरू आहे?- आॅस्ट्रेलिया दौरा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. यापूर्वी मी इंग्लंड व बांगलादेश इथं भारतीय महिला क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील निवड ही माझ्यासाठी परदेशात क्रिकेट खेळण्याची हॅटट्रीक ठरली आहे. आॅस्ट्रेलियातील वन-डे आणि ट्वेंटी-२० या दोन्ही सामन्यात मी खेळणार आहे. २६ जानेवारीपासून या स्पर्धा सुरू होणार आहेत. भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. त्यासाठी रोज न चुकता सराव सुरू आहे. नवीन कौशल्यं आत्मसात करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. आता जबाबदारी वाढली आहे. मुलींना क्रिकेटमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत का?- हो खूप चांगल्या संधी आहेत. मुलींनी क्रिकेटमध्ये यावं, खेळावं. अनेक खासगी कंपन्यांचं सहकार्य लाभत आहे. अद्ययावत क्रीडा साहित्य मिळते. बीसीसीआयची मदत होते. भारतातील सर्वोत्तम खेळाडूंशी बीसीसीआय करार करते. माझ्याशी बीसीसीआयनं दहा लाखाचा करार केला आहे. हा ग्लॅमरस खेळ आहे. त्यामुळं राज्य, राष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे थेट टीव्हीवर प्रक्षेपण होतं. मानसन्मान मिळतो. प्रसिध्दी मिळते. उत्तम कामगिरी केलेल्या मुलींना राज्य, केंद्र शासनासह एमसीए व बीसीसीआयचे पुरस्कारही मिळतात. फक्त मुलींनी धाडसानं खेळायची गरज आहे. क्रिकेटमध्ये करिअरच्या सुवर्णसंधी आहेत. मुलींनी क्रिकेट खेळावं. मुलींचा सहभाग कसा आहे?- बरा आहे. मुलींच्या खेळातील सहभागाबाबत समाजात जागृतीची गरज आहे. पालकांनी मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. शाळा, महाविद्यालयांतूनही मुलींना सहकार्य मिळालं पाहिजे. देशातील विविध राज्यांचे महिला क्रिकेट संघ आहेत. हळूहळू मुलींचा क्रिकेटमधील सहभाग वाढतोय. यात आलेल्या मुलींनी चिकाटीनं सराव करावा. या खेळातील तुझी पुढची वाटचाल काय असेल?- क्रिकेटनं आजवर मला खूप काही दिलं आहे. एमसीए आणि बीसीसीआयचा ‘वुमेन क्रिकेटर आॅफ द इयर’ पुरस्कारही मिळाला. सध्या सांगलीतील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात बी. कॉम.च्या प्रथम वर्षात शिकत आहे. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. सध्या सरावावर लक्ष केंद्रित केलं आहे. सर्वोत्तम फलंदाजी कशी करता येईल, फलंदाजीतील नवनवीन कौशल्यं काय आहेत याची माहिती घेऊन त्याचा सराव करत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघात निवड होण्याची ही सहावी वेळ आहे. दमदार खेळ करून प्रत्येक वेळी आम्ही विजयश्री खेचून आणली आहे. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कस लागणार आहे. भारताचा महिला संघही अनुभवी आहे. मला विश्वास आहे की, आम्ही आॅस्ट्रेलियामध्ये भारताचा तिरंगा नक्की फडकवू. सांगली आणि क्रिकेटविषयी तू काय सांगशील?- सांगलीच्या मातीनंच मला घडवलं आणि सातासमुद्रापार पोहोचवलं. वडील आणि भावाच्या प्रेरणेनं मी क्रिकेट खेळू लागले. छत्रपती शिवाजी स्टेडियम व चिंतामणराव महाविद्यालयाचं मैदान ही माझी कर्मभूमी. सांगलीकरांनी प्रेम दिलं. माझ्या यश, निवडीबद्दल माझे ठिकठिकाणी सत्कारही झाले. सांगलीकरांची अशी आपुलकीची थाप माझी ‘एनर्जी’ ठरत गेली. अकराव्या वर्षी मी क्रिकेटची बॅट हातात धरली. सांगलीतील अनंत तांबवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत गेले. खेळत गेले. जिद्दीनं क्रिकेटमधील कौशल्यं शिकली. बरे-वाईट अनुभव आले. त्यातून जग कळालं. मनाची चिकाटी आणि आत्मविश्वास कधीच ढळू दिला नाही. जिल्हास्तरीय ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांपर्यंतच्या प्रवासानं बरंच शिकवलं. प्रत्येक स्पर्धेला मी एक आव्हान म्हणूनच स्वीकारलं. सरावातील सातत्यामुळं यश मिळत गेलं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं प्रत्येक वेळी सहकार्य लाभलं. बीसीसीआयनंही माझ्यातील गुणवत्ता ओळखली आणि सकारात्मकता दाखवत मदत केली. भारतीय महिला संघातून खेळायचा अनुभव चांगला आहे. बडोदा इथं २०१२ मध्ये झालेल्या सामन्यात १९ वर्षाखालील गटात मी नाबाद २२४ धावांचा विक्रम केला होता. दिवसभर डोक्यात क्रिकेटच असतं. क्रिकेटसाठी अजून बरंच करायचं आहे. आदित्यराज घोरपडे
सांगलीच्या मातीनं सातासमुद्रापार पोहोचवलं
By admin | Published: January 10, 2016 11:08 PM