सांगली : अचानक रोकडची मागणी वाढल्याने जिल्ह्यातील बँकांकडे नोटांची टंचाई जाणवू लागली आहे. तुटवड्याच्या चर्चेचे विपरित परिणाम म्हणून आता गरज नसतानाही बँकेतून पैसा काढून तो जवळ बाळगण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे जिल्हा अग्रणी बँकेमार्फत उपाययोजना सुरू झाल्या आहेत.जिल्ह्याला दरमहा जेवढी रोकडची गरज आहे, तेवढी उपलब्धता होत असतानाही नोटांची टंचाई निर्माण झाली आहे. म्हणजेच रोख रकमा काढण्याकडे अचानक लोकांचा कल वाढल्याचे दिसत आहे. नोटांच्या तुटवड्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरत असल्याने, अनेक ग्राहकांनी गरज नसताना एटीएम व बँकांमधून पैसे काढण्यास सुरुवात केली आहे.
अग्रणी बँकेसाठी ही चिंतेची बाब बनली आहे. येत्या काही दिवसात ही स्थिती सुधारली नाही, तर चलनाचा मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कॅशलेस व्यवहारांकडे ग्राहकांना जास्तीत जास्त वळविणे गरजेचे बनले आहे.
शहरातील एटीएममध्ये अजूनही पुरेसा पुरवठा आहे. मोठ्या रकमेची मागणी पुरविण्यात अनेक एटीएम अयशस्वी ठरत आहेत. मात्र पाच ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या रकमा मिळत आहेत. तरीही एटीएममधील व्यवहारही आता वाढत असल्याचे चित्र आहे.राष्ट्रीयीकृत बँकांमधील ग्राहकांकडूनही खात्यावरील पैसे काढण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बँकांमध्ये गर्दी होत आहे. दोन हजाराच्या नोटांची देशभरातील टंचाई पाहता, त्याचा भार आता कमी किमतीच्या नोटांवर पडत आहे. २00 आणि १00 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात आता रोकड उपलब्ध करून दिली जात आहे. पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटाही ग्राहकांना दिल्या जात आहेत.रकमा घरात, व्यवहार कॅशलेसबँकांमधून काढलेली रोकड घरात बाळगून अन्य व्यवहार कॅशलेस स्वरुपात करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. अचानक अडचण निर्माण झाली, तर रोकड असावी, म्हणून ती बाळगण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळे गरज नसतानाही नोटा काढल्या जात आहेत. नेमकी हीच स्थिती बँकांना चिंताजनक वाटते.