सांगली : धनगर आरक्षणासंदर्भात टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टिस)ने दिलेल्या अहवालाबाबत सांगली जिल्ह्यातील धनगर समाजाने संताप व्यक्त केला आहे. या अहवालाच्या माध्यमातून भाजपचा खरा चेहरा समोर आल्याचे मत धनगर समाजोन्नती मंडळाच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजित दुधाळ यांनी व्यक्त केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या भघजप सरकारचा यानिमित्ताने खरा चेहरा समोर आला आहे. बारामती येथे झालेल्या अभूतपूर्व आंदोलनावेळी भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावर येऊन सत्ता आमच्या हाती दिल्यास धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यांच्या या भुलथापांना बळी पडून धनगर समाजाने आपल्या मताचे भरभरून दान भाजपच्या पारड्यात टाकले.
केंद्र व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत येण्यास धनगर समाजाच्या मतांचा मोठा आधार आहे. तरीही आरक्षण दिल्यास धनगर समाज सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होऊन आगामी काळात तो अडसर ठरेल म्हणून आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत ठेवण्यात आला आहे. आरक्षणासाठी समाजाला झुलवत ठेवण्यासाठीच गरज नसताना ‘टीस’ या संस्थेकडे सर्व्हेक्षण करण्याची जबाबदारी दिली. संस्थेने दिलेल्या अहवालात आता धनगर व धनगड या दोन वेगवेगळ््या जाती असल्याचा उल्लेख करण्यात आल्याने समाजात सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे एसटी प्रवर्गाच्या सवलतींची अंमलबजावणी झाली नाही, तर या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.