प्रताप महाडिक ल्ल कडेगाव कडेगाव तालुक्यातील कडेपूर जिल्हा परिषद गट खुला झाल्याने जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक मैदानात उतरण्याची संधी चालून आली आहे. देवराष्ट्रे जि. प. गटात सर्वसाधारण महिला आरक्षण आल्याने येथे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्या स्नुषा व माजी पंचायत समिती सदस्या वैशालीताई शांताराम कदम यांनी निवडणूक लढवावी, असा कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे जि. प. गटावर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे, तर कडेपूर जि. प. गटावर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे वर्चस्व आहे. यामुळे कडेपूर गटातून संग्रामसिंह व देवराष्ट्रे गटातून वैशालीताई यांना होम ग्राऊंडवर विजयाचा विश्वास असल्याने निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. याबाबत कार्यकर्त्यांत चर्चा आहे. दरम्यान, तडसर आणि वांगी जि. प. गटात कॉँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई रंगणार आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत देवराष्ट्रे येथे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण आल्याने शांताराम कदम यांनी हक्काचा देवराष्ट्रे जि. प. गट सोडून कडेगाव गटातून निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. यावेळी वांगीतून सुरेश मोहिते, देवराष्ट्रेतून कॉँग्रेसचे वैभव गायकवाड असे कॉँग्रेसचे ३ उमेदवार विजयी झाले, तर कडेपूर गटातून राष्ट्रवादीच्या सुवर्णाताई पिंगळे (सध्या भाजप) या विजयी झाल्या. दरम्यान, आता कडेपूर वगळता उर्वरीत देवराष्ट्रे, वांगी, तडसर या गटात आरक्षण पडले. यामुळे विद्यमान जि.प. सदस्य शांताराम कदम व सुरेश मोहिते यांची संधी हुकली आहे. देवराष्ट्रे जिल्हा परिषद गट कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या हक्काच्या गटातून वैशालीताई कदम यांनी निवडणूक लढविण्यासाठी कॉँग्रेस कार्यकर्ते आग्रही आहेत. परंतु याबाबत ज्येष्ठ नेते मोहनराव कदम काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. वैशालीताई यांच्याविरोधात भाजपकडून महिला उमेदवार कोण? याबाबतही उत्सुकता आहे. कडेपूर जि. प. गटातही कॉँग्रेसकडून सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. वांगी गटात सर्वसाधारण महिला व तडसर गटात ओबीसी महिला आरक्षण आहे. या दोन्ही गटात कॉँग्रेस आणि भाजपकडून तुल्यबळ उमेदवार निवडणूक लढवितील, यामुळे येथेही चुरशीची लढाई रंंगणार आहे. कडेगाव पंचायत समितीच्या ८ जागांसाठी निवडणूक होत आहे. मागील निवडणुकीत कॉँग्रेसचे ६, तर राष्ट्रवादीचे २ (सध्या भाजप) असे संख्याबळ होते. आता सत्ता अबाधित ठेवण्यासाठी कॉँग्रेसचे, तर सत्तांतरासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. आगामी जि. प. व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही उमेदवार उभा करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे मतदानावर काय परिणाम होणार, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. उमेदवार निवडी : नेत्यांसमोर आव्हान परस्परविरोधी कॉँग्रेस व भाजपमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. यामुळे उमेदवार निवडीचे आव्हान राजकीय नेत्यांपुढे आहे. पृथ्वीराज देशमुख यांच्या भाजपमधील प्रवेशानंतर तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद मर्यादित बनली आहे. क्रांती समूहाचे नेते अरूण लाड यांच्यावर राष्ट्रवादीची भिस्त अवलंबून आहे. आघाडीचे राजकारण न करता पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी, असा सामान्य कार्यकर्त्यांपासून नेतेमंडळींचाही सूर आहे. पण आता आरक्षणे जाहीर झाल्यानंतर इच्छुकाची निवडून येण्याची क्षमता, विरोधी गटाचा संभाव्य उमेदवार या साऱ्या बाबींचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी असली तरी नेमका उमेदवार निवडताना नेतेमंडळींची कसोटी लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच अपवाद वगळता नेतेमंडळींना कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढवावी लागणार आहे. अरुण लाड यांच्या भूमिकेकडे लक्ष पलूस-कडेगाव तालुक्यात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून एकसंधपणे माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांच्याविरोधात सत्तासंघर्ष केला. परंतु २०१४ च्या निवडणुकीत पृथ्वीराज देशमुख भाजपमध्ये गेले आणि अरुण लाड राष्ट्रवादीत राहिले. आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अरुण लाड कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संग्रामसिंह, वैशालीतार्इंना उमेदवारी !
By admin | Published: October 10, 2016 12:28 AM