सांगली : होम-हवन, पूजा-विधी अशा पारंपारिक पद्धतींना फाटा देत त्यातून वाचलेल्या खर्चातून एका कुटुंबाने बांधकाम कामगार, विधवा महिला यांचा सन्मान करीत गृहप्रवेश केला. त्यांच्याच हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजनही करण्यात आले.मिरज तालुक्यातील करोली (एम) येथे संजय गोविंदराव देशमुख यांच्याकडून हा अनोखा गृहप्रवेश समारंभ पार पडला. नव्या घरात प्रवेश करताना नेहमी परंपरेप्रमाणे गारवा, होम-हवन, पूजा-अर्चा असे विधी केले जातात. पण देशमुख यांनी या पारंपारिक पद्धतीला फाटा दिला. त्यातून वाचलेल्या पैशातून त्यांचे घर साकारणारे कामगार, अभियंता तसेच विधवा महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा फुले तसेच आई-वडिलांच्या प्रतिमेचे पूजन करुन देशमुख कुटुंबियांनी गृहप्रवेश केला.घराची नव्हे चेहऱ्यांची दिशा योग्य हवीप्रबोधनकार ए. डी. पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, वास्तुशास्त्रानुसार घराचे तोंड कोणत्या दिशेला असावे हे सांगितले जाते. मात्र, यापेक्षा घरात राहणाऱ्या सदस्यांची तोंडे एकमेकांकडे असणे आवश्यक आहे. घरात राहणाऱ्या लोकांच्या मनात माणुसकी आणि मायेचा ओलावा असणे महत्त्वाचे आहे. घरातील लोक निर्व्यसनी आणि नाती जपणारी हवीत. तरच घरात कायम सुख, शांती नांदू शकते.
देशमुख यांनी उचललेले हे पाऊल अत्यंत स्तुत्य आहे. सांगली शहरासह ग्रामीण भागातही आम्ही यासाठी चळवळ उभारत आहोत. अंत्यविधीला फाटा देत निसर्गपूरक अंत्यसंस्कार करण्याची परंपरा जशी रुजविली आहे, तशी आता शुभकार्यातही माणुसकी व महापुरुषांच्या विचारांचे बिजारोपण करण्याची परंपरा पुढे नेत आहोत. - ए. डी. पाटील, उपाध्यक्ष, मराठा समाज संस्था, सांगली