लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील एकूण ७८६ लाभार्थ्यांचे फेरसर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ५७ लाभार्थी अपात्र ठरले. निराधारच्या निकषात बसत नसतानाही त्यांनी लाभ घेत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे संबंधितांची पेन्शन थांबविण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार योजनेची बैठक समितीच्या अध्यक्षा ज्योती आदाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत एकूण २०५ प्रस्ताव ठेवण्यात आले. यापैकी १०३ प्रकरणे मंजूर करण्यात आली. यामध्येे विधवा परित्यक्ता, घटस्फोटित, दिव्यांग, वृद्ध निराधार यांचा समावेश होता. ३८ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले.
शासनाच्या आदेशानुसार अपात्र शोध मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकूण ७८६ प्रकरणाचा फेरसर्व्हे करण्यात आला. यामध्ये ५७ लाभार्थी अपात्र निघाले. काही तक्रारी आल्याने त्या प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्यात आली. वय बसत नाही, मुले सज्ञान आहेत, रेशन कार्डवर फेरफार खाडाखोड करणे, चुकीची माहिती सांगणे, विवाहित असताना अविवाहित असल्याचे दर्शविणे, मुले असताना नसल्याचे सांगणे अशा गोष्टी समितीच्या व प्रशासनाच्या लक्षात आल्या. अध्यक्षा आदाटे यावेळी म्हणाल्या की, काही जण कित्येक महिने बँकेतून पेन्शन काढत नाहीत. याचा अर्थ त्यांना पैशाची गरज नाही असा होतो. त्यामुळे त्यांची पेन्शन पूर्णपणे थांबवली जाते. त्यामुळे दर महिन्याला लाभार्थ्यांनी बँकेतून पैसे काढावे, असे आवाहन केले.
यावेळी आशाताई पाटील, अनिता निकम, बिपिन कदम, संतोष भोसले, भगवानदास केंगार, नितीन काळे, आप्पासो ढोले, तहसीलदार के.व्ही. घाडगे, तलाठी एम. आय. मुलाणी आदी उपस्थित होते.