तासगाव : भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी लोकसभेसाठी राष्टÑवादी आणि काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांनी तासगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला. जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता, भाजप आणि काँग्रेसमध्ये कोणाचीच उमेदवारी निश्चित नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत. काँग्रेसकडून मी इच्छुक आहे. मात्र माझ्यापेक्षाही कोणी सरस उमदेवार असेल, तर मी थांबायला तयार आहे. यावेळी काँग्रेस आणि राष्टÑवादीकडून उमेदवार कोण असेल यापेक्षा, भाजपचा पराभव करण्याचेच आमचे मुख्य ध्येय आहे. काँग्रेसची उमेदवारी निश्चित नाही. मात्र भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांचीही उमेदवारी भाजपकडून निश्चित नाही. संजय पाटील यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी राष्टÑवादीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडेदेखील लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
प्रतीक पाटील म्हणाले की, मागील लोकसभा निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी आश्वासने लोकांना दिली होती. तसेच काँग्रेसच्या विरोधात नाराजीची लाट होती. त्यामुळे जनतेनेही लोकसभेसाठी उमेदवार कोण आहे हे न पाहता, मोदी लाटेला भुलून मतदान केले. त्यामुळेच माझा पराभव झाला. मात्र गेल्या साडेचार वर्षात आणि तीन राज्यांच्या निवडणूक निकालानंतर मोदी लाट ओसरली असल्याचे दिसून येत आहे.पाणी योजनांचे फक्त आकडेचसंजय पाटील पाणी योजनांसाठी साडेचार वर्षात प्रत्येकवेळी कोटींचे आकडे सांगतात. मी केंद्रात मंत्री असताना मंजूर झालेल्या दोनशे कोटींपैकी या सरकारच्या काळात दीडशे कोटी मिळाले आहेत. मात्र त्यानंतर आजअखेर फक्त प्रत्येकवेळी वाढवून कोटींचे आकडेच फक्त आम्ही ऐकत आहोत. प्रत्यक्षात काहीच मिळाले नाही, अशी टीकाही यावेळी प्रतीक पाटील यांनी केली.सदाशिव पाटील सर्वत्रच !विट्याचे काँग्रेसचे माजी आमदार सदाशिव पाटील सर्वच पक्षांच्या व्यासपीठावर दिसून येतात. त्यामुळे त्यांची नेमकी कोणत्या नेत्याशी जवळीक आहे, हे समजत नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी होत आहे. तसेच आमदार अनिल बाबर आणि माझे कार्यकर्ते एकच असून मी अनेकदा त्यांच्या व्यासपीठावर जाहीरपणे गेलो असल्याचे प्रतीक पाटील यांनी यावेळी सांगितले.विशालनी किती थांबायचे?यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद, बाजार समितीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येकवेळी विशाल पाटील यांची समजूत घालून थांबविले होते. यावेळी सांगलीत विधानसभेसाठी काँग्रेसकडून सक्षम उमेदवार हवा आहे. जयश्री पाटील आणि विशाल पाटील यांच्यातील सक्षम उमेदवार ठरवून निर्णय घेतला जाईल, असे प्रतीक पाटील म्हणाले.