अर्जुन कर्पे
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात खासदार गटाचे काही आजी-माजी पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्या राजकीय गडाला राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांनी सुरुंग लावला आहे.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तालुक्यातील पहिल्या फळीतील नेते माजी सभापती चंद्रकांत हाक्के, दादासाहेब कोळेकर, हायुम सावनूरकर यांनी खासदार पाटील यांच्या गटात प्रवेश करीत राष्ट्रवादीला रामराम केला होता. सध्या राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. या सत्तेत राष्ट्रवादी प्रमुख पक्ष आहे.
आगामी काळात बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांनी कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यांनी फोडाफोडीचा डाव टाकत खासदार पाटील यांना राजकीय चक्रव्यूहात अडकवले आहे. माजी सभापती चंद्रकांत हाक्के, पंचायत समितीचे माजी सभापती विकास हाक्के, कवठेमहांकाळ बाजार समितीचे माजी सभापती दादासाहेब ऊर्फ पिंटू कोळेकर, हायुम सावनूरकर यांच्यासह तालुक्यातील काही सरपंच, उपसरपंच येत्या चार दिवसांत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. हा प्रवेश जवळजवळ निश्चित झाला असून, खासदार गटाला मोठा धक्का बसणार आहे.
गेली आठ वर्षे खासदार पाटील यांनी या राजकीय शिलेदारांना घेऊन तालुक्यात राजकारण केले होते. आता हेच शिलेदार त्यांना सोडचिठ्ठी देत आमदार सुमनताई पाटील, सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या राजकीय प्रवेशाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. सोमवार, दि. १८ रोजी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत हा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.