तासगाव : खासदार संजय पाटील यांच्या विजयोत्सवाची मिरवणूक आज (शनिवारी) सायंकाळी तासगावात पार पडली. हजारो भाजपचे कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या मध्यभागी उघड्या जीपमध्ये उभे असलेल्या संजय पाटील यांचे ठिकठिकाणी औक्षण करण्यात येत होते. गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शुक्रवारी निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शहरात मोटरसायकल रॅली काढत जल्लोष केला होता. आज सकाळपासून संजय पोटील यांना शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती. सायंकाळी शहरात कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचे आयोजन केले होते. ढोल-ताशे, डॉल्बीच्या ठेक्यात कार्यकर्ते संजय पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. शहरात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. बाजार समितीमधील संजय पाटील यांच्या कार्यालयातून मिरवणुकीस सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मिरवणूक मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आली. मिरवणूक मार्गावरील रस्ते गुलालाने माखले होते. गणपती मंदिरात संजयकाकांनी गणरायाचे दर्शनही घेतले. ठिकठिकाणी नागरिक त्यांचा पुष्पहार घालून स्वागत करत होते. हातात भगवे झेंडे घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. मिरवणुकीवेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. तासगावमधूनही संजय पाटील यांना मताधिक्य मिळाल्याने विजयी मिरवणुकीवेळीही लोकांमध्ये उत्साह दिसून येत होता. याच मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्याकडून दोनवेळा संजय पाटील यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे विजयी मिरवणुकीचा आनंद त्यांना या मतदारसंघात कधीही घेता आला नाही. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विक्रमी विजय मिळविल्यामुळे संजय पाटील यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या या विजयोत्सवाला महत्त्व आले होते. समर्थक कार्यकर्त्यांनीही तितक्याच उत्साहात हा आनंद साजरा केला. गुलालाने न्हाऊन निघालेले कार्यकर्ते, फडकणारे भगवे झेंडे आणि फटाक्यांची आतषबाजी अशा वातावरणात ही मिरवणूक पार पडली. (वार्ताहर)
तासगावात संजय पाटील यांची मिरवणूक कार्यकर्त्यांचा जल्लोष : गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी
By admin | Published: May 18, 2014 12:19 AM