हणमंत पाटील
सांगली : उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराच्या मोर्चेबांधणीसाठी दोन दिवस सांगलीत तळ ठोकला होता. या काळात त्यांनी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप व शिवसेनेचे माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या घरी जेवण करून चर्चा केली. मात्र, राऊत यांच्या डिनर डिप्लोमसीचा उद्धवसेनेच्या उमेदवाराला फायदा होण्याऐवजी या दोन्ही नेत्यांनी विरोधकांची बाजू घेतली आहे.सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून बिघाडी निर्माण झाली आहे. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीची उमेदवारी उद्धवसेनेला दिल्याचा आक्षेप काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला. तसेच, काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष व काँग्रेस असे दोन अर्ज भरले आहेत. ही बंडखोरी रोखण्यासाठी, तसेच सांगलीतील उद्धवसेनेची ताकद अजमाविण्यासाठी संजय राऊत यांनी दोन आठवड्यांपूर्वी सांगली मतदारसंघाचा दोनदिवसीय दौरा केला होता.
सांगलीच्या दौऱ्यात महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसच्या दोन व राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना भेटण्याऐवजी राऊत यांनी विरोधकांना भेटण्याला प्राधान्य दिले. त्यामध्ये भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेले माजी आमदार विलासराव जगताप व माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या ते घरी गेले. ‘डिनर डिप्लोमसी’ केल्याने दोन्ही नेते पाठिंबा देतील, अशी आशा राऊत यांना होती. मात्र, घडले उलटेच. या दोन्ही नेत्यांनी उद्धवसेनेच्या उमेदवाराऐवजी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
टीकाटिप्पणीने काँग्रेसमध्ये नाराजी..संजय राऊत यांनी सांगलीच्या दौऱ्यावर असताना भाजपऐवजी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नेत्यांवर टीकाटिप्पणी केली. विशाल पाटील यांचे पायलट असलेले माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे विमान गुजरातला जाईल, अशी टीका राऊत यांनी केली. त्यामुळे घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते दुखावले. नाराज झालेल्या काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांच्या बंडखोरीला प्रोत्साहन दिले.