कवठेमहांकाळ : माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या दरबारात सोमवारी चक्क खासदार संजयकाका पाटील यांनी हजेरी लावली, तीही कार्यकर्त्यांच्या फौजेसह! दोघांनी बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चाही केली. निमित्त होते घोरपडे यांच्या वाढदिवसाचे. संजयकाकांची दूध संघाच्या कार्यालयातील ‘एन्ट्री’ बघून उपस्थित सगळेच अवाक् झाले होते.सोमवारी घोरपडे यांचा वाढदिवस होता आणि खासदार पाटीलही तालुक्याच्या दौऱ्यावर होते. ढालगाव भागातील टेंभू योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी ते दादासाहेब कोळेकर, हायूम सावनूरकर, अनिल लोंढे, मिलिंद कोरे, अनिल शिंदे यांच्यासोबत आले होते. कामाची पाहणी करून ते थेट ‘कुची कॉर्नर’वरील अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या दूध संघाच्या कार्यालयात शिरले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कारण गेले वर्षभर घोरपडे आणि संजयकाका यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत. दोघांनी एकमेकांची भेटही घेणे बंद केले आहे. त्यांच्यातील बेबनावामुळे काकांची ही ‘एन्ट्री’ आश्चर्यकारक ठरली.मधल्या काळात तालुक्याच्या राजकीय पटलावर पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत घोरपडे गटाच्या तानाजी यमगर यांना शेवटच्या क्षणाला आर. आर. पाटील आबा गटाने चेकमेट केले. त्यामुळे घोरपडे गट नाराज झाला आणि हीच संधी काकांनी साधली आणि पुन्हा एकदा राजकीय दुनियादारी सुरू करण्यासाठी घोरपडे यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ही भेट एवढ्यावरच थांबली नाही, तर घोरपडे आणि संजयकाकांनी बंद खोलीत अर्धा तास चर्चा केली. या भेटीने तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या चर्चेत नेमकी काय खलबते झाली, हे जरी समजू शकले नसले तरी, ही भेट राजकीय आणि आगामी राजकारणासाठी होती, हे निश्चित आहे.संजयकाका आणि घोरपडे हे दोघे भाजपमध्ये असूनही दोघांत वर्षभर दुरावा होता. बाजार समितीच्या निवडणुकीत घोरपडेंनी पतंगराव कदम यांचा हात धरत राष्ट्रवादीसोबत घरोबा केलेल्या संजयकाकांना धक्का दिला. तेव्हापासून काका आणि घोरपडे यांच्यातील दुरावा वाढतच गेला. सोमवारी घोरपडेंच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने हा तुटलेला राजकीय दोर पुन्हा एकदा गाठ बांधून जोडण्याचा प्रयत्न संजयकाकांनी केला आहे. त्यामुळे तालुक्यात नवीन राजकीय समीकरणे निर्माण होणार आहेत. ती कशी असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)कार्यक्रमाकडे लक्षयेत्या २२ तारखेला नागज येथे टेंभू योजनेचे पाणीपूजन आहे. या कार्यक्रमाला घोरपडे उपस्थित राहणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण गेल्या काही दिवसात खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे घोरपडे यांनी जाणीवपूर्वक टाळले आहे.
घोरपडेंच्या दरबारात संजयकाकांची हजेरी
By admin | Published: April 19, 2016 12:16 AM