आष्टा : कृषिभूषण संजीव गणपतराव माने यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली यांच्यातर्फे डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल अशोका अॅग्रो उद्योग समूहाचे संस्थापक संचालक सतीश पाटील यांच्या हस्ते माने यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सतीश पाटील म्हणाले, डॉ. संजीव माने यांना राज्य शासनाने ‘कृषिभूषण’ व ‘शेतीनिष्ठ पुरस्कार’ देऊन गौरविले आहे. माने यांनी ऊसाचे एकरी १०० टन उत्पादन घेण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम यशस्वी प्रयोग करून असंख्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हजारो शेतकऱ्यांच्या ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक यासह देशातील विविध ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. माने यांनी एकरी १६८ टन ऊस उत्पादन घेऊन जागतिक विक्रम केला आहे. सध्या ऊसाचे एकरी २०० टन उत्पादन घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी ऊस शेतीत केलेले कार्य शेतकऱ्यांना उपयुक्त आहे. यावेळी प्रतीक पाटील, पोखर्णीच्या सरपंच रेखा पाटील, तंत्र अधिकारी बिभीषण पाटील, अभियंता अजिंक्य माने उपस्थित होते.
फोटो : २७१२२०२०-आयएसएलएम-आष्टा संजीव माने सत्कार न्यूज
ओळ : कृषिभूषण संजीव माने यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल ‘अशोका अॅग्रो’चे संचालक सतीश पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.