२) संख (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : संख (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ जीवनदायी ॲम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) तीन महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने बंद आहे. तत्काळ आरोग्य सेवा मिळत नाही. रुग्णवाहिकेला कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा, अशी मागणी होत आहे.
संख आरोग्य केंद्रात १६ गावे समाविष्ट आहेत. यामध्ये संख, अंकलगी, गोंधळेवाडी, दरीबडची, लमाणतांडा (दरीबडची), खंडनाळ, तिल्याळ, जालिहाळ खुर्द, सिद्धनाथ, मुचंडी, दरीकोणूर, पांढरेवाडी, आसंगी तुर्क, धुळकरवाडी, मोटेवाडी, पांडोझरी ही गावे आहेत. दरीबडची, अंकलगी, आसंगी तुर्क, मुचंडी, संख, आसंगी (जत) ही सहा उपकेंद्रे आहेत.
संख प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ जीवनदायी रुग्णवाहिका तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. ती रुग्णांसाठी जीवनदायी ठरली आहे. प्रसूतीसंख्या व रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण अधिक आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेची गरज आहे.
रुग्णवाहिकेचे डॉक्टर आजारी असल्याने रजेवर आहेत. ती तीन महिन्यांपासून बंद आहे. डॉक्टर नसल्याने गाडी जागेवरून हलवली जात नाही. त्यामुळे गाडीला कायमस्वरूपी डॉक्टरची आवश्यकता आहे.
जीव गमावण्याची वेळ
अनिलकुमार शिवलिंग मुडेगोळ (वय ३०, रा. बिळूर) यांचा गेल्या वर्षी संख-आसंगी रस्त्यावर अपघात झाला होता. १०८ रुग्णवाहिका डॉक्टर नसल्याने आली नाही. मृतदेह एक तास जागेवरच पडून होता. अतिरक्तस्राव होऊन मृत्यू झाला होता.
राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त तरीही...
संख प्राथमिक आरोग्य केंद्राला २००८ मध्ये राज्यस्तरीय आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे. सुसज्ज इमारत आहे. दररोजची बाह्यरुग्ण संख्या, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियासंख्या अधिक आहे. मात्र, डॉक्टरअभावी १०८ रुग्णवाहिका बंद आहे.
कोट
डॉक्टर नाहीत, हा विषय आमच्या अखत्यारीत येत नाही. तरीसुद्धा रुग्णांना तत्काळ सेवा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाकडे डॉक्टरची मागणी केली आहे.
- डॉ. स्नेहलता सावंत,
प्राथमिक आरोग्य अधिकारी, संख