लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : माती वाहतूक करणारे जप्त वाहन सोडण्यासाठी व कारवाई टाळण्यासाठी दोन लाख ३० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे व माडग्याळचे तलाठी विशाल विष्णू उदगिरे (वय ३७) या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी कारवाई केली. उदगिरे याला रंगेहाथ पकडले असून, म्हेत्रे फरार झाला आहे.
संबंधित तक्रारदार हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. ते आपल्या वाहनातून मातीची वाहतूक करीत होते. अप्पर तहसीलदार म्हेत्रे व तलाठी उदगिरे यांनी त्यांचे वाहन अडवून जप्त केले. कारवाई न करता हे वाहन सोडण्यासाठी तक्रारदाराकडे अडीच लाखांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने ५ जून रोजी लाचलुचतपत प्रतिबंध विभागाकडे अर्ज केला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार वेळा या तक्रारीची पडताळणी केली. यात लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी संख तहसील कार्यालयात दोन लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी उदगिरे याला रंगेहाथ पकडण्यात आले, तर म्हेत्रे फरार झाला. या दोघांवर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, पोलीस अंमलदार अविनाश सागर, अजित पाटील, संजय संकपाळ, राधिका माने, संजय कलगुटगी, रवींद्र धुमाळ, सलीम मकानदार, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, श्रीपती
देशपांडे, भास्कर भोरे, सीमा माने, बाळासाहेब पवार यांनी केली आहे.