तासगाव : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात आबा व काका गटाची सत्ता आली. मात्र अनेक ग्रामपंचायती आमच्या आहेत, यावरून वादंग सुरू झाले. आबा गटाने २५, तर काका गटाने २३ ग्रामपंचायतींवर दावा ठोकला आहे. दि. १६, १७ व १८ अशी सरपंच निवड होत आहे. सोमवारी १३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडी झाल्या. यात आबा गटाने ६, तर काका गटाने ९ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे, तर मंगळवारी १३ पैकी ८ ग्रामपंचायतींवर भाजपने, तर ८ गावांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व सरपंच, उपसरपंच भाजपचा की राष्ट्रवादीचा, हा तिढा सुटताना दिसत नाही.सोमवारी तालुक्यात आबा गटाने १३ पैकी बोरगाव, कवठेएकंद, विसापूर, तुरची, निंबळक, धामणी या सहा ग्रामपंचायतींवर आमचे सरपंच व सत्ता असल्याचा दावा केला आहे; तर खा. काका गटाने १३ पैकी विसापूर शिरगाव, जुळेवाडी, आळते, निंबळक, ढवळी, हातनोली, खालसा धामणी, राजापूर व येळावी या ९ ग्रामपंचायतींवर आपले सरपंच असल्याचा दावा केला आहे.मंगळवारी १३ पैकी खा. काका गटाने गोटेवाडी, पाडळी, मोराळे पेड, विजयनगर, धोंडेवाडी, नरसेवाडी, डोर्ली, लोढे या आठ ग्रामपंचायतींवर आपली सत्ता आल्याचा दावा केला आहे.तसेच आबा गटाने मांजर्डे, हातनूर, धुळगाव, कौलगे, लोढे, नरसेवाडी, विजयनगर व डोर्ली या आठ गावांमध्ये आमची सत्ता आल्याचा दावा केला आहे. तसेच नागाव कवठेमध्ये संयुक्त सत्ता आली, असे राष्ट्रवादीने सांगितले. अनेक ग्रामपंचायतींवर सरपंच व उपसरपंच आमचेच असल्याचा दावा दोन्ही गटांनी केला आहे. (वार्ताहर)लोढ्यात सत्ता एकाची; सरपंच एकाचा! तालुक्यातील लोढे येथे ग्रामपंचायतीत पितांबर गटाची सत्ता आली आहे. त्यांच्याकडे ५ ग्रामपंचायत सदस्यांचे संख्याबळ आहे; तर विरोधी विलास पाटील गटाचे २ सदस्य आहेत. सत्ता पितांबर पाटील गटाची आली, मात्र आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आहे. मात्र सत्ताधारी गटाकडे मागास प्रवर्गाची एकही महिला नाही, तर विरोधी गटाकडे मागास प्रवर्गच्या दोन्हीही महिला. त्यामुळे विरोधी गटाची महिला सरपंच झाली आहे. त्यामुळे सत्ता एकाची, तर सरपंच एकाचा, असा प्रकार झाला आहे.
सरपंच, उपसरपंच आमचा की तुमचा?
By admin | Published: November 17, 2015 11:37 PM