तासगाव :
तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे सरपंच प्रदीप माने यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांच्या सरपंचांनी मुसक्या आवळल्या. आपत्ती व्यवस्थापन समिती आक्रमक झाली असून कमांडो फोर्सच्या जवानांनी तीन दिवसांत ४० जणांवर कारवाया केल्या आहेत. यात अवैध दारू व गुटका यांचा समावेश आहे.
कोरोनाचा कहर तासगाव तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज रुग्णसंख्या दीडशे ते दोनशेच्या घरात जात आहे. मात्र, लोकांना सांगूनही नियम न पाळणे, काम नसतानाही बाहेर फिरण्याचे प्रकार ग्रामीण भागात वाढत आहेत. तालुक्यात मोठ्या गावात संख्या वाढत चालल्याने दहशतीचे वातावरण होते. मात्र, सावर्डेत वाढती रुग्णसंख्या पाहता सरपंच प्रदीप माने, उपसरपंच, पोलीस पाटील व सदस्यांनी गावात बंदोबस्तासाठी कमांडो फोर्सला पाचारण केले.
मार्शल कमांडो फोर्सच्या सोमनाथ यमगर, अर्जुन सातवेकर, अनिकेत जोगदंड, शुभम बुचडे, सुशांत संदे, तेजस्वी माळकर, प्रणोती माळकर यांनी तीन दिवसांत गावात मास्क न वापरणे, विनाकारण बाहेर फिरणे यांसह गुटका व दारू विक्रीप्रकरणी ४० जणांवर कारवाया केल्या आहेत. बुधवारी त्यांनी दारू विक्रीसाठी आणलेल्या एकाला पाठलाग करून ४८ बाटल्या पकडल्या व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. कमांडो कारवायांमुळे गावात रुग्णसंख्या कमी झाली असून टीमचे गावात कौतुक होत आहे.