सांगली : मिरज तालुक्यातील पद्माळे येथील सरपंच सचिन जगदाळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावातील कोरोनाग्रस्त रुग्णांना लागणारी सर्व औषधे व रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ड्रायफ्रुट, अंडी स्व:खर्चातून देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लोटेने जिल्ह्यात थैमान घातले आहे. सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला आहे. अनेक कुटुंबे कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. मिरज तालुक्यातील पद्माळे गावाने पहिल्या लाटेचा यशस्वी मुकाबला केला. सध्या दुसऱ्या लाटेत या गावात पंधरा कोरोनाबाधित असून, ते गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांची घरची परिस्थिती बेताची असते. त्यामुळे रुग्ण औषधोपचारास टाळाटाळ करतात, मात्र पद्माळे गावचे सरपंच जगदाळे यांनी जिल्ह्यात त्यांच्या खर्चाचा भार उचलला आहे.
रुग्णांना लागणारे सर्व औषधे सरपंच सचिन जगदाळे स्वत: देत आहेत. याशिवाय रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रुग्णांना आवश्यक असलेले खाद्य म्हणजे अंडी, काजू, बदाम, बेदाणे याचासुद्धा पुरवठा त्यांनी सुरू केला आहे.
याबाबत जगदाळे म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट धोकादायक आहे. यातून गावातील सर्व नागरिकांचा बचाव करण्याची जबाबदारी माझी आहे. सध्या गावात गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत; पण त्यांना लागणारी औषधे व पौष्टिक खाद्य देण्याचे काम मी स्वत: करत आहे. लवकरच गाव कोरोनामुक्त करण्याचा मानस आहे.