विटा (सांगली) : कडेगाव तालुक्यातील ३६ गावांत ड्रोनव्दारे सिटी सर्व्हे करण्यात येणार असून त्यात गावठाणच्या हद्दी, गावातील घरे आणि रस्त्यांच्या हद्दी निश्चित केल्या जाणार आहेत. परंतु, हे करीत असताना भूमिअभिलेख विभागाने सरपंच व ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही. त्यामुळे कडेगाव तालुक्यात ड्रोनव्दारे सिटी सर्व्हे करण्यास सरपंच परिषदेने तीव्र विरोध केला असून, याबाबतचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दिले.शासनाच्या निर्णयानुसार भूमिअभिलेख कार्यालयाने ड्रोनव्दारे गावांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, ग्रामसेवक वगळता कोणालाही याबाबत माहिती दिलेली नाही. सर्व्हे करताना तेथे ग्रामस्थ व सरपंच असणे गरजेचे आहे. घाईगडबडीत सर्व्हे करून भूमिअभिलेख कार्यालय गावोगावी पुन्हा हद्दीचे व रस्त्यांचे वाद नव्याने निर्माण करून देणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या अनुपस्थितीत चुकीचा सर्व्हे होण्याची शक्यता आहे. हा सर्व्हे करण्यास ३६ गावांतील सरपंचांचा विरोध असून याबाबत शासनाने भूमिअभिलेख कार्यालयाला सूचना द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.याबाबतचे निवेदन सरपंच परिषदेच्यावतीने आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार मोहनराव कदम, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनाही देण्यात आले.
सांगली: ड्रोनने गावांचा सिटी सर्व्हे करण्यास सरपंचांचा विरोध
By श्रीनिवास नागे | Published: September 02, 2022 4:14 PM