सांगली : जिल्ह्यातील २००हून अधिक थॅलेसेमिया रुग्णांची कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात औषधे आणण्यासाठी हाेत असलेली ससेहोलपट आता थांबली आहे. फाइट अगेन्स्ट थायलेसेमिया या संघटनेने केलेल्या मागणीनुसार सांगलीच्या शासकीय रुग्णालयातच औषधे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे गेली वर्षभर सुरू असलेली त्यांची गैरसोय थांबली आहे.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक जिल्हा रुग्णालयात थॅलेसेमिया रुग्णांच्या तपासणीसाठी हिमॅटोलॉजिस्ट किंवा बालरोगतज्ज्ञ आहेत व जिल्हा रुग्णालयातच थॅलेसेमिया रुग्णांना औषधे दिली जातात, परंतु सांगली जिल्ह्यात २००पेक्षा अधिक थॅलेसेमिया रुग्ण असूनही, रुग्णालयात मात्र थॅलेसेमिया रुग्णांसाठी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जावे लागते आणि आवश्यक तपासण्या खर्चिक असूनही त्या जिल्हा रुग्णालयात होत नसल्यामुळे त्या तपासण्या बाहेर पैसे खर्चून कराव्या लागतात. औषधेसुद्धा जिल्हा रुग्णालयात मिळत नसल्यामुळे अनेक थॅलेसेमिया रुग्ण आणि पालकांना औषधे आणण्यासाठी कोल्हापूर किंवा सातारा रुग्णालयात जावे लागत होते, तर अनेक रुग्ण गेले वर्षभर औषधांसाठी फाइट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशनशी संपर्क साधत होते आणि संघटनेच्या वतीने या रुग्णांना सांगलीत औषधे घरपोच केली जात होती.
सांगली जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी हिमॅटोलॉजिस्ट किंवा चांगल्या बालरोगतज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी, सांगली जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्येच औषधे उपलब्ध करून द्यावीत, आवश्यक तपासण्या मोफत करून मिळाव्या, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन फाइट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशनच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे आणि मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना देण्यात आले होते. त्यानंतर ऑर्गनायझेशनच्या वतीने सातत्याने होत असलेल्या पाठपुराव्यामुळे डॉ. नणंदकर यांनी याबाबतीत शासन स्तराबरोबरच वैयक्तिक लक्ष घालून मिरज सिव्हिलमध्ये थॅलेसेमिया रुग्णांसाठी आवश्यक असणारी डिसिरॉक्स, केल्फर ही औषधे उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये बालरोगविभाग प्रमुख डॉ. शिशिर मिरगुंडे यांचेही सहकार्य मिळाले.
फाइट अगेन्स्ट थॅलेसेमिया संघटनेचे अध्यक्ष धनंजय नामजोशी, सचिव सत्यजित इंगवले, सांगलीतील थॅलेसेमिया रुग्ण ओंकार कदम, स्वप्नील भंडारे, पालक दत्तात्रय कदम, सुनील भंडारे यांनी औषधे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला.