सातारा : जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघात आज, सोमवारी झालेल्या अर्ज छाननीत ३२ अर्ज अवैध ठरले. परिणामी आता १६० उमेदवारांचे २२८ अर्ज वैध ठरल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. सर्व प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत बुधवार (दि. १ आॅक्टोबर) आहे. यानंतरच लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. फलटण मतदारसंघात ३३ उमेदवारांचे ३८ अर्ज वैध ठरले. बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार शंकर मोहिते यांनी मतदारयादीचा नोंदणी पुरावा दिला नसल्याने अर्ज अवैध ठरला.वाईतून हणमंत राजपुरे, संतोष गायकवाड यांनी ‘रिपाइं’कडून अर्ज दाखल केला होता. मात्र, एबी फॉर्म नसल्यामुळे अर्ज अवैध ठरले. रामदास जाधव यांचाही अर्ज अवैध ठरला. येथे १६ उमेदवारांचे २९ अर्ज वैध ठरले. कोरेगावात दीपक जाधव यांची प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी नसल्याने अर्ज अवैध ठरला. अभिजित रणदिवे यांचे तीनपैकी दोन अर्ज अवैध ठरले. येथे १६ उमेदवारांचे १९ अर्ज वैध ठरले. माणमध्ये २१ उमेदवारांचे २८ अर्ज वैध ठरले. येथे अनिल देसाई यांनी राष्ट्रवादीकडून भरलेला अर्ज अवैध ठरला. अपक्ष म्हणून त्यांचा अर्ज कायम आहे. अजित नलवडे, अनिल झेंडे, तुकाराम गायकवाड, राजेंद्र जगताप यांचे अर्ज अवैध ठरले.‘कऱ्हाड उत्तर’मध्ये १३ उमेदवारांचे २२ अर्ज वैध तर दोन अर्ज अवैध ठरले. चंद्रसेन जाधव यांनी शिवसेनेकडून भरलेला अर्ज एबी फॉर्म नसल्यामुळे तर भानुदास कोळ यांचे नाव मतदार यादीत नसल्यामुळे अर्ज अवैध ठरला. ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये २४ उमेदवारांचे ३३ अर्ज वैध तर तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. चंद्रशेखर विभुते यांनी राष्ट्रवादी आणि अपक्ष असे अर्ज दाखल केले होते. मात्र, एबी फॉर्म नसल्यामुळे अवैध ठरले. विलासराव पाटील यांनी दाखल केलेल्या चारपैकी एक अर्ज अवैध ठरला. सतीश यादव यांनी मनसेकडून दाखल केलेला अर्ज एबी फॉर्म नसल्यामुळे अवैध ठरला. पाटणमध्ये २३ उमेदवारांचे ३३ अर्ज वैध ठरले असून प्रकाश पाटील, नरेश देसाई यांचे अर्ज अवैध ठरले. ‘सातारा-जावळी’मध्ये सचिन गंगावणे यांचे तीनही अर्ज अवैध ठरले.चिल्लरबहाद्दर उमेदवाराचा अर्ज वाईत अवैध- वाई विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करताना अनामत रक्कमेसाठी चिल्लर आणणारे उमेदवार रामदास जाधव यांचा अर्ज आज, सोमवारी छाननीदरम्यान अवैध ठरला. त्यांनी त्यांच्या अर्जावरील तिसऱ्या रकान्यात सहीच केली नव्हती. - ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी निवडणुकीत अनामत रक्कम म्हणून दहा हजारांची चिल्लर आणली होती. ती मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरश: घाम फुटला होता. - त्याच कल्पकतेचा आधार घेत रामदास जाधव यांनी चिल्लर आणली आणि ती मोजताना अधिकाऱ्यांना घाम फुटला. मात्र, आज झालेल्या छाननीदरम्यान, त्यांचा अर्ज अवैध ठरला.
सातारा जिल्ह्यात ३२ अर्ज अवैध
By admin | Published: September 29, 2014 11:56 PM