मिरज : कोरोना साथीमुळे गेली दीड वर्षे बंद असलेली सातारा-कोल्हापूर व मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर सुरू होत आहे. मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर सोमवार दि. १५ व सातारा-कोल्हापूर पॅसेंजर मंगळवार दि. १६ पासून पुन्हा नेहमीच्या वेळेत धावणार आहे. पॅसेंजर सुरू करण्यांसाठी प्रवाशांकडून मागणी होत असल्याने मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने सातारा-कोल्हापूर व मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा-कोल्हापूर पॅसेंजर सातारा येथून पहाटे ५.३० वाजता सुटेल. मिरजेत सकाळी ८.२५ वाजता व कोल्हापूर येथे ९.५५ वाजता पोहोचेल. कोल्हापूर-सातारा पॅसेंजर कोल्हापूर स्थानकातून दुपारी ४.५५ वाजता सुटेल, मिरजेत सायंकाळी ५.४५ वाजता व सातारा येथे रात्री १०.५० वाजता पोहोचेल. कोरेगाव, रहिमतपूर, तारगाव, मसूर, शिरवडे, कराड, शेणोली, भवानीनगर, ताकारी, किर्लोस्करवाडी, आमणापूर, भिलवडी, नांद्रे, माधवनगर, सांगली, विश्रामबाग, मिरज, जयसिंगपूर, तमदलगे, हातकणंगले, वळीवडे या स्थानकांत ही पॅसेंजर थांबणार आहे.
मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर मिरजेतून दररोज सकाळी ६.२५ वाजता सुटेल. कुर्डुवाडी येथे सकाळी १०.१५ वाजता पोहोचेल. कुर्डुवाडी येथून सकाळी १०.५५ वाजता सुटेल. मिरजेत दुपारी ३.१० वाजता येईल. या पॅसेंजरला आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जवळा, वासुद, सांगोला, पंढरपूर व मोडनिंब या स्थानकात थांबा देण्यात आला आहे. पॅसेंजर गाड्या सुरू झाल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. आता मिरज-बेळगाव, मिरज-पंढरपूर, मिरज-कोल्हापूर, मिरज-पुणे, मिरज-कॅसलराॅक या पॅसेंजरही सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.