सातारा : अनंत चतुर्थीच्या दिवशी ड्राय डे असताना दारूची विक्री केल्याप्रकरणी साताऱ्यांतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून तीन लाख ३० हजार ४४५ रुपयांची विदेशी दारू जप्त केली. तसेच हॉटेल मालक व कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अनंत चतुर्थीला ड्राय डे घोषित करण्यात आला होता. रविवारी दुपारी गोडोली येथील लेक व्ह्यू हॉटेलमध्ये दारूची चोरटी विक्री सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांना मिळाली.
त्यानुसार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सातारा शहरचे उपनिरीक्षक नानासाहेब कदम, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक ढवळे व कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी हॉटेलमध्ये चोरटी दारू विक्री सुरू असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून तीन लाख ३० हजार ४४५ रुपयांची विदेशी दारू जप्त केली.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात हॉटेल मालक राजू घुले (रा. सातारा) व कामगार शंकर महादेव जाधव (वय ४६, वनघळ, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.