सांगली : खटाव (ता. पलूस) येथे अकराव्या शतकातील सतीशिळेमुळे पलूस परिसराचा ११०० वर्षांपूर्वीचा इतिहास समोर आला आहे. खटावमध्ये नरसिंह मंदिरासमोर ही सतीशिळा आहे.सतीशिळेवरील सतीलेख हळेकन्नड लिपीत आहे. उभ्या दोन व आडव्या तीन अशा एकूण पाच ओळींमध्ये सतीशिळेची व तत्कालीन घटनेची माहिती कोरण्यात आली आहे. इतिहासकाळात पलूस येथे झालेल्या लढाईत रायनायक याचा मुलगा मंगनायक हा धारातीर्थी पडल्याचा संदर्भ शिलालेखामध्ये आहे.पतीनिधनानंतर मंगनायकच्या दोन्ही पत्नी एकाचवेळी सती गेल्या होत्या. या सतीत्वाची स्मृती शिलालेखाच्या रुपाने जपण्यात आली आहे. लेखामध्ये पलूस गावचा उल्लेख पळशीअली असा केला आहे.लेखातील बरीच अक्षरे कालौघात पुसट झाले आहे. दुर्गवेध संस्थेतर्फे त्याचा अभ्यास अद्याप सुरु आहे. या सतीलेखातील अक्षरांची लेखनशैली अन्य जिल्ह्यांत आढळलेल्या चालुक्यकालीन अक्षरलेखनाशी साम्य दर्शविणारी आहे, त्यामुळे हा सतीलेख अकराव्या शतकातील असल्याचे अनुमान करता येते. सतीलेखाचे वाचन मिरज साहित्य संशोधन मंडळाचे शिलालेख अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांनी केले आहे.सतीशिळायुद्धात धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यासाठी वीरगळ स्वरुपात शिल्पे तयार करतात, तद्वतच त्यांच्या मृत्यूपश्चात सती जाणाऱ्या पत्नीच्या स्मृती सतीशिळेच्या माध्यमातून जपल्या जातात. महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी अशा सतीशिळा आढळतात, पण शिलालेख असणाऱ्या सतीशिळा फारच कमी आहेत. सतीशिळा एक, दोन किंवा तीन टप्प्यांत बनविल्या जातात. सतीचा कोपरापासून वाकवलेला व काकणे घातलेला हात, पतीसोबत शिवलिंगाचे पूजन करताना, घोड्यावरील वीर किंवा स्त्रिया, बाजूला लहान मुलांचे चित्रण व वरती सूर्य, चंद्र असे कोरीवकाम केले जाते. सांगली जिल्ह्यात खटाव, आष्टा, कवलापूर, अंकलखोप, अंबक, दुधगाव, मिरज आदी गावांत सतीशिळा सापडतात.
सतीलेखाने उलगडला पलूसचा ११०० वर्षांपूर्वीचा इतिहास, लेखनशैली चालुक्यकालीन अक्षरलेखनाशी साम्य दर्शविणारी
By संतोष भिसे | Published: September 24, 2022 2:16 PM