सांगली : शहर पोलिसांनी छडा लावलेल्या बनावट नोटांची पाळेमुळे पश्चिम बंगालपर्यंत असल्याने याचा छडा लावण्यासाठी दहशतवादविरोधी (एटीएस) पथक शनिवारी सांगलीत दाखल झाले. या पथकाच्या मदतीने संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुुरु आहे. पथकाने जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडून तपासाची सर्व माहिती घेतली.पंधरा दिवसापूर्वी शहर बनावट नोटांप्रकरणी शहर पोलिसांच्या पथकाने राज सिंह (वय २८), प्रेमविष्णू राफा (२६), नरेंद्र ठाकूर (३३), सूरज ऊर्फ मनीष ठाकुरी (३६) व जिलानी शेख (४७) यांना अटक केली. हे सर्वजण कल्याण आणि नवी मुंबईतील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून दोन हजारच्या तब्बल १२३ बनावट नोटा जप्त केल्या. त्यांनी राज्यभरात तब्बल पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात आणल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
चौकशीत रॅकेटचे मुख्य केंद्र पश्चिम बंगाल असल्याचे निष्पन्न झाले. टोळीतील मासे सांगलीत पोलिसांच्या गळाला लागल्याचे समजातच मोहरे सावध झाले. त्यांचे मोबाईल बंद झाले. त्यामुळे पोलिसांचा तपासच थांबला आहे. तरीही पोलीस तांत्रिक पद्धतीने तपास करीत आहेत.तपासाची दिशा पश्चिम बंगलाकडे वळली. पण तिथे जाऊन तपास करणे, हे तितके सोपे नाही. यासाठी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी या तपासात एसटीएसची मदत घेणार असल्याचे दोन दिवसापूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार एटीएसचे पाच जणांचे पथक शनिवारी सांगलीत दाखल झाले.
पथकाने पोलीसप्रमुख शर्मा यांची भेट घेतली. त्यांच्याकडून तपासाची माहिती घेतली. तसेच शहर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी गणेश शिंदे यांच्याकडून आतापर्यंत झालेला तपास? पुढे कशाप्रकारे तपास करावा लागेल? पश्चिम बंगालमध्ये ही टोळीे कशाप्रकारे कार्यरत आहे? याची माहिती घेतली. सायंकाळी हे पथक मुंबईला रवाना झाले.राज्यभर टोळी सक्रियदोन हजाराचा बनावट नोटा चलनात आणणारी ही टोळी राज्यभर सक्रिय होती. राज्यातील अनेक शहरात त्यांनी या नोटा सहजपणे चलनात आणल्या आहेत. ही टोळी पश्चिम बंगलमधील टोळीच्या संपर्कात कशी आली? त्यांचे राज्यात आणखी कोणी साथीदार आहेत का? याचा छडा लाऊन संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. तपास थांबला तर आणखी काही दिवसानंतर टोळीचा पुन्हा उद्योग सुरु राहण्याची शक्यता आहे.