बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने सांगलीत शहर पोलीस ठाण्यालगत शनिवारचा आठवडी बाजार भरला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्बंधांमुळे सांगलीचा शनिवारचा आठवडी बाजार बंद राहिला. बाजारानिमित्त गर्दीने भरून जाणारा शहर पोलीस ठाण्याजवळचा परिसर आज शांत होता. गणपती पेठेत मात्र नेहमीप्रमाणे उलाढाल झाली.
कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने २३ मार्चपासून पंधरा दिवसांसाठी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे सांगलीतील शनिवारचा आठवडी बाजार बंद राहिला. आदेश न जुमानता काही व्यापारी बाजारपेठेत येण्याच्या शक्यतेने सकाळी शहर पोलिसांनी मुख्य रस्त्यांवर फेरफटका मारला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही सकाळी चौकाचौकात पाहणी केली. काही व्यापाऱ्यांना बाजार बंद असल्याची सूचना दिली. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यालगत व्यावसायिकांची गर्दी नव्हती. दररोजचे व्यापारीच रस्त्याकडेला थांबून होते. कापड पेठ, हरभट रस्ता, गुजराथी हायस्कूल, धान्य बाजार येथेही गर्दी नव्हती. ग्रामीण भागातूनही शेतकरी शहराकडे फिरकले नाहीत. त्यामुळे शिवाजी मंडई परिसर व मारुती रस्त्याला आठवडा बाजाराची गर्दी नव्हती. सराफ कट्ट्यावरही विशेष वर्दळ नव्हती. गणपती पेठेत मात्र नेहमीप्रमाणे उलाढाल झाली. ग्रामीण भागात माल नेण्यासाठी वाहनांची गर्दी होती. पटेल चौक, तानाजी चौक, झाशी चौकात वाहनांच्या रांगा होत्या.