शिराळा (जि.सांगली) : काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असून त्यांनी आगामी वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा विशेष जनसंवाद मेळावा रविवारी शिराळा येथे आयोजित केला आहे. त्यानंतर सोमवारी ते महाजनादेश यात्रेदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करतील, असे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. विधानपरिषदेचे माजी सभापती, दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित यांच्याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत चाचपणी सुरू होती. त्यानंतर शिराळा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक व देशमुख यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची, तसेच कोणाला कोणते पद द्यायचे, याबाबत मुंबईतील बैठकीत चर्चा झाली. देशमुख भाजपमध्ये आल्यास मतदारसंघातील काँग्रेसचे अस्तित्व संपणार आहे. शिवाजीराव नाईक आणि देशमुख हे दोन गट एकत्र आणून राष्ट्रवादीचे इच्छुक मानसिंगराव नाईक आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी ही खेळी भाजपने खेळली आहे. तथापि देशमुख यांना उमेदवारी द्यायची की महामंडळाचे अध्यक्षपद द्यायचे, याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे.काँग्रेसच्या नेत्यांमध्ये उदासीनता आहे. राष्ट्रवादी म्हणेल, त्याप्रमाणे काँग्रेसचे नेते निर्णय घेत आहेत. आघाडीमध्ये काय निर्णय घ्यायचा, याची चर्चा होत नाही, हे दुर्दैव असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांचा भाजप प्रवेश निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 6:13 AM