विकास शहाशिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघाचा राज्याच्या राजकारणात दबदबा आहे. एकाचवेळी तीन आमदार, दोन खासदार मिळालेला हा मतदारसंघ आहे. आता भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याप्रमाणे जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांना विधान परिषदेची आमदारकी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.विधान परिषदेसाठी देशमुख तर विधानसभेसाठी सम्राट महाडिक असे राजकीय गणित भाजपमध्ये जुळण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र सत्यजित यांनी काँग्रेस पक्षात कुचंबणा होत असल्याच्या कारणावरून भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख गट एकत्र आले. मात्र शिवाजीराव नाईक यांचा पराभव झाला.निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता आली. काही महिन्यांपूर्वी शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता अचानक भाजप व एकनाथ शिंदे गटाची सत्ता आली. शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने सत्यजित देशमुख यांचा विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सम्राट महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवली होती. आता त्यांचा कल विधानसभा निवडणूक लढविण्याकडेच आहे. यामुळे शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी सत्यजित देशमुख यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.ज्या पद्धतीने राज्य पातळीवर राजकीय समिकरणे बदली आहेत. तशीच अनुभुती आता शिराळा मतदार संघातील राजकारणात येत आहे. सध्या राष्ट्रवादी विरोधात भाजप अशा दोन गटामध्ये राजकीय चढाओढ सुुरु आहे. यातुन तालुक्यात कोण सरस ठरणार हे येणारा काळच निश्चित करेल.
सत्यजित देशमुख यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 5:19 PM