अशोक पाटील
इस्लामपूर : शिराळा मतदारसंघातील राजकारण वाळवा-शिराळा तालुक्यातील वेगळ्या वळणावर जात आहे. प्रत्येक निवडणुकीत तडजोडीच्या राजकारणात पैरा फेडीचा विसर पडतो. देशमुख गटाची अशीच परिस्थिती झाली आहे. कधी बंडखोरी, तर कधी तडजोड, यामुळे आगामी काळात सत्यजित देशमुख यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.
विधानसभेच्या १९९५ पासून २०१९च्या निवडणुकीपर्यंत वाळवा तालुक्यातील ४८ गावांत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात प्रबळ गट तयार करून वलय निर्माण केले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक यांच्या बंडखोरीचा फटका त्यांना बसला.त्या विधानसभा निवडणुकीआधी सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाऊन शिवाजीराव नाईक यांना ताकद दिली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा शब्द प्रमाण मानला. त्यापूर्वी स्थानिक पातळीवर शिवाजीराव देशमुख आणि शिवाजीराव नाईक एकत्र आले होते. आता देशमुखांना सोडून नाईक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील- आ. मानसिंगराव नाईक यांच्या गटात सामील होणार आहेत. शिराळ्यातील राजकारणात सर्वच नेत्यांना पैऱ्याचा विसर पडत आला आहे.
कार्यकर्त्यांची मने जुळणार का?
शिराळा मतदारसंघात सर्वच निवडणुकांत कार्यकर्ते आपापल्या नेत्यांच्या भूमिकेनुसार वागतात. याचा परिणाम ग्रामीण भागात झाला आहे. स्थानिक पातळीवर गटातटाच्या राजकारणात कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत. आता नेते एक झाले, तरीही स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मने जुळण्याची सुतराम शक्यता नाही.
आम्हाला काँग्रेसने भरपूर दिले, परंतु जिल्हा पातळीवरील नेत्यांनी डोंगरी भागाला दुर्लक्षित केले. वाळवा-शिराळ्यातील काँग्रेसची वाताहत होत गेली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. वरिष्ठांनी शिराळ्यात भाजपला ताकद दिली, तरच पक्ष सक्षम होईल. - सत्यजित देशमुख, प्रदेश सदस्य, भाजप.