विकास शहा ।लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिराळा मतदारसंघातील राजकारण निर्णायक टप्प्यावर आले आहे. भाजपकडून कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांना पक्षात घेऊन विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा असून, सत्यजित देशमुख व आमदार शिवाजीराव नाईक सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे समजते. या भेटीतच देशमुख यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरणार असल्याची चर्चा आहे.यावेळी शिराळा विधानसभेसाठी भाजपकडून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा प्रयत्न आहे. आघाडीत शिराळा कॉँग्रेसला मिळण्याची शक्यता धूसर असल्याने देशमुख सध्या सक्षम पर्यायाच्या शोधात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांना विधानसभेची आॅफर देण्यात आली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख यांना तातडीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोलावले आहे. आज-सोमवारी ही भेट होणार असून, यामध्ये देशमुख यांच्या पक्षप्रवेशाबाबत निर्णय होणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीसाठी शिवाजीराव नाईक शनिवार, दि. २० रोजी, तर सत्यजित देशमुख रविवार, दि. २१ रोजी मुंबईला रवाना झाले आहेत. आमदार शिवाजीराव नाईक यांना विधानपरिषदेवर संधी देऊन शिराळा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसचे अस्तित्व संपविणे, आमदार शिवाजीराव नाईक यांच्या अडचणीतील संस्थांना उर्जितावस्था देणे आदी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे.देशमुख यांना भाजपमध्ये घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला, पर्यायाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याची खेळी भाजपचे आखली आहे. पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरू असताना, सत्यजित देशमुख मात्र भाजप प्रवेशाची शक्यता नाही, असे सांगत आहेत.सध्या शिराळा तालुक्यात आमदार शिवाजीराव नाईक यांच्या संस्था अडचणीत आहेत. त्यामुळे विधानसभेला त्यांची उमेदवारी अडचणीची ठरू शकते, यामुळेच देशमुख यांना उमेदवारी देण्याची खेळी सुरू आहे. तसेच शिवाजीराव नाईक यांच्यासारखा ज्येष्ठ मार्गदर्शक, अभ्यासू नेता, आपल्यापासून बाजूला जाऊ नये, यासाठी त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे शिराळ्यातील दोन राजकीय गट भाजपसोबत एकत्र राहतील. तसेच आमदार नाईक यांच्या संस्था अडचणीतून काढण्यासाठी पक्षाने मदत करायची, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांचे जिल्ह्याच्या राजकारणात पुनर्वसन करायचे, या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.सत्यजित देशमुख यांना भाजपची उमेदवारी, तसेच वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद द्यायचे, असा राजकीय फंडा आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक हे आपल्याकडे येणार नाहीत, हे जाणून भाजपने थेट काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्याकडे चाचपणी सुरू केली आहे. दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्यजित देशमुख प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे भाजपने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत देशमुख यांच्याकडे प्रयत्न सुरू केले आहेत.या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची उमेदवारी नक्की आहे. त्यामुळे सत्यजित देशमुख यांचा भाजपकडे कल जाण्याची शक्यता आहे. जर सत्यजित देशमुख यांना भाजपने उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.विधानसभेसह महामंडळाचे अध्यक्षपद?आमदार नाईक यांना विधानपरिषदेचे सदस्यपद द्यायचे, त्यांच्या अडचणीतील संस्थांचे व रणधीर नाईक यांचे राजकीय पुनर्वसन करायचे, या मुद्द्यावर आमदार नाईक यांनी थांबायचे, तर सत्यजित देशमुख यांना विधानसभेची उमेदवारी व वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद द्यायचे, हे चर्चेचे प्रमुख मुद्दे असतील.भाजप प्रवेशासाठी १० सप्टेंबरचा मुहूर्तभाजप प्रवेशाबाबत सत्यजित देशमुख यांनी आतापर्यंत मौन पाळले असले तरी, विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी १० सप्टेंबर रोजी देशमुख यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे.अमित शहा, देवेंद्र फडणवीस आग्रही!विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याशी अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक होती. यामुळे स्वच्छ प्रतिमा असलेल्या सत्यजित देशमुख यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस व अमित शहा आग्रही आहेत. शिवाजीराव देशमुख यांचा पैरा फेडण्यासाठी सत्यजित देशमुख यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा आहे.
सत्यजित देशमुखांच्या भाजप प्रवेशाचा आज ठरणार मुहूर्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:54 PM