कासेगाव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी वाळवा तालुक्यातील ४८ गावात काँग्रेसचा गट मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्या-त्या गावातील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांत समेट घडवून आणला जात आहे. गाव तेथे कार्यकते हे धोरण अवलंबले जात असून, एकंदरीत या धोरणामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत.गत विधानसभा निवडणुकीमध्ये शिराळा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना वाळवा तालुक्यातील ४८ गावातून १८ हजार इतके मतदान झाले होते, तर याउलट मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक यांना जवळपास ४० हजार इतके मतदान झाले होते. शिवाजीराव नाईक हे तर या गावातील मतदानावरच विजयी झाले आहेत. मात्र सत्यजित देशमुख यांना या तालुक्यातील ठराविक गावातूनच बऱ्यापैकी मतदान झाले होते. त्यामुळे त्यांच्या झालेल्या पराभवासाठी वाळवा तालुक्यातील पडलेले कमी मतदान हे एक प्रमुख कारण होते.त्यामुळे ही चूक सुधारुन सत्यजित देशमुख यांनी आता गावा गावात नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधत गट पुनर्बांधणीस सुरुवात केली आहे. त्यामध्ये कासेगावातून अॅड. बी. डी. पाटील, ज्ञानदेव पाटील, कृष्णा माळी, जयदीप पाटील, वाटेगाव येथून गणपत पाटील, प्रदीप शिंदे, अतुल पाटील, काळमवाडी येथून सुनील सावंत, नेर्ले येथून जयकर कदम, किरण थोरात, तांबवे येथून शंकर तोडकर, दादा पाटील, ऐतवडे बुद्रुक येथून प्रताप घाटगे, बाबा गायकवाड, ऐतवडे खुर्द येथून जोश्नाताई पाटील, तांदुळवाडी येथील प्रवीण पाटील, सतीश पाटील, येडेनिपाणी येथील आनंदा पाटील तसेच कामेरी, येलूर, इटकरे,भाटवाडी, पेठ, सुरुल, रेठरेधरण आदी गावातही जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण केले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्तेही रिचार्ज झाले आहेत. एकंदरीत साडेतीन वर्षानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी देशमुख यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच उत्साहाचे वातावरण आहे. (वार्ताहर)‘सुपर पॉवर...’वाळवा तालुक्यातून नेहमीच शिवाजीराव नाईक यांच्या पाठीशी असणारी ही ४८ गावे नाईकांच्या विजयात ‘सुपर पॉवर’ म्हणून ओळखली जातात. येथे आता सत्यजित देशमुखांनी लक्ष घातले असून, कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खाच्या कार्यक्रमात ते न चुकता हजेरी लावत आहेत. एकूणच त्यांचे कार्यकर्त्यांची नवीन फळी तयार करण्यासाठी प्रयत्न आहेत.
सत्यजित देशमुखांचे ‘त्या’ ४८ गावांत लक्ष
By admin | Published: June 17, 2015 11:13 PM