मोहन मोहिते/वांगी : अनिष्ट रूढी, परंपरेला फाटा देणारा सत्यशोधक विवाह सोहळा वांगी (ता. कडेगाव) येथे मंगळवारी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीस पार पडला. या सोहळ्यात विधवा महिलांनाही हळदी-कुंकवाचा मान मिळाला, तर वºहाडी मंडळींना ७०० पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
वांगी येथील परशुराम माळी या शेतकऱ्याचा मुलगा विक्रम आणि मणेराजुरी (ता. तासगाव) येथील नरसिंह चौगुले यांची कन्या सुप्रिया यांचा विवाह मंगळवारी सत्यशोधक महासंघाच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी व पाणी चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत सत्यशोधक पध्दतीने पार पडला. नववधू-वरांना हळद लावण्याचा मान विधवांना देण्यात आला होता. ‘शेतकºयाचा आसूड’सह महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित ७०० पुस्तकांचे वाटप वºहाडी मंडळींना करण्यात आले.
वधू पक्षाकडून भांडी, पैसे व कोणताही मानपान न घेता फक्त पुस्तकांचा आहेर स्वीकारण्यात आला. उपस्थितांकडूनही आहेर म्हणून फक्त पुस्तकेच स्वीकारण्यात आली. लग्नाचा पारंपरिक विधी न करता प्रतिमा परदेशी व डॉ. पाटणकर यांनी सत्यशोधक पध्दतीने नववधू-वरांना शपथ देत हा विधी पार पडला. त्यानंतर नववधू-वरांनी एकमेकांना पुस्तके देऊन नवजीवनाची सुरुवात केली.
ज्येष्ठ सिनेअभिनेते विलास रकटे, आ. मोहनराव कदम, अरूण लाड, शलाका पाटणकर, नामदेव करगणे, सुरेश मोहिते, मोहनराव यादव, सु. धों. मोहिते, भाई संपतराव पवार उपस्थित होते.विधवांना सन्मान...शुभ कार्यक्रमात विधवांना हीन व अपमानास्पद वागणूक दिली जाते. मात्र या सत्यशोधक विवाह सोहळ्यात विधवांचा सन्मान केला गेला. आगामी काळातही असे सत्यशोधक विवाह समारंभ आयोजित करून समाजाने विधवांचा सन्मान करावा, असे मत सन्मान मिळालेल्या लतादेवी बोराडे यांनी व्यक्त केले.वांगी (ता. कडेगाव) येथे मंगळवारी विधी, परंपरांना फाटा देत सत्यशोधक पध्दतीने विवाह सोहळा पार पडला. यावेळी डॉ. भारत पाटणकर यांनी नववधू-वरांना सत्यशोधक शपथ दिली.