सातारा : सातारा जिल्ह्यात रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सातारा शहरातील प्रमुख मार्गांवरून शाही मिरवणूक काढण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सातारा शहरात मिरवणूक, प्रतापगडावर पालखी मिरवणूक काढून जय भवानी, जय शिवाजीचा गजर करण्यात आला. सातारा शहराबरोबरच जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सातारा शहरात शाही मिरवणूक काढण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीचे पूजन झाल्यानंतर शाही मिरवणूक मार्गस्थ झाली. तसेच शहरातील चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सातारा शहरातील वातावरण भगवेमय झाले होते. महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडावरही शिवजयंती उत्सव सोहळा पार पडला. जिल्हा परिषद, महाबळेश्वर पंचायत समिती व कुंभरोशी ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्ताने प्रतापगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवपुतळ्यावर फुलांची सजावट करण्यात आली होती. दरम्यान, पहाटेच्या सुमारास श्री भवानी मातेच्या मंदिरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते व प्रतापगडचे किल्लेदार विजय हवालदार यांच्या उपस्थितीत अभिषेक व महाआरती करण्यात आली. सकाळी साडेआठला मंदिराच्या आवारात देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कुंभरोशीचे सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. त्यानंतर साडेनऊ वाजता भवानीमाता मंदिरातून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत शालेय मुलांनी शिवकालीन वेशभूषा परिधान केल्यामुळे वातावरण शिवमय झाले होते. पालखीचे आगमन शिवपुतळा येथे होताच ‘जय भवानी, जय शिवाजी, हरहर महादेव’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. जिल्हा परिषदेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
साताऱ्यात दुमदुमली बुलंद शिवघोषणा !
By admin | Published: February 19, 2017 11:09 PM