बॉम्बवर्षावात उपाशीपोटी तीन दिवस बसमध्येच, सौरभने सांगितले युक्रेनमधील थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 05:18 PM2022-03-05T17:18:21+5:302022-03-05T17:22:13+5:30

विमानतळ २० किलोमीटरवर असताना रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. हल्ले सुरू झाल्याने विमानतळही बंद झाले.

Saurabh Vijay Isapure from Miraj shared his experience in Ukraine | बॉम्बवर्षावात उपाशीपोटी तीन दिवस बसमध्येच, सौरभने सांगितले युक्रेनमधील थरारक अनुभव

बॉम्बवर्षावात उपाशीपोटी तीन दिवस बसमध्येच, सौरभने सांगितले युक्रेनमधील थरारक अनुभव

Next

मिरज : ‘विमानतळ २० किलोमीटरवर असताना रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. हल्ले सुरू झाल्याने विमानतळही बंद झाले. वाहतूक कोंडीत बस अडकल्याने तीन दिवस बसमध्येच अडकलो होतो... तेही उपाशीपोटी!’, युक्रेनमधील अनुभव सांगताना सौरभ इसापुरेच्या डोळ्यात पाणी आले. मिरजेतील इसापुरे गल्लीतील सौरभ विजय इसापुरे (वय २०) हा वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेला विद्यार्थी शुक्रवारी सायंकाळी मिरजेत परतला.

साैरभ युक्रेनमधील चर्नी वेस्ट येथे एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. युध्द सुरू झाल्यानंतर मायदेशी येण्यासाठी त्याने भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. त्याच्यासह ४० विद्यार्थ्यांना रुमानिया येथून विमानाने भारतात रवाना करण्यात आले. मिरजेत तो रेल्वे स्थानकात आल्यानंतर इसापुरे कुटुंबियांना आनंदाश्रू अनावर झाले. घरी आल्यानंतर आई, वडील, आजाेबा, आजी, काका, काकू, भाजपचे शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, गजेंद्र कुल्लोळी यांनी त्याचे स्वागत केले.

सौरभ वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये दोन वर्षांपूर्वी गेला होता. युध्द सुरू झाल्यानंतर तो मायदेशी परतण्यासाठी म्हणून महाविद्यालयाच्या बसने बॉरिस्पिटल विमानतळाकडे तिकीट काढण्यासाठी निघाला. विमानतळ २० किलोमीटरवर असताना रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. हल्ले सुरू झाल्याने विमानतळही बंद झाले.

वाहतूक कोंडीत बस अडकल्याने साैरभ व इतर विद्यार्थी तीन दिवस बसमध्येच अडकले होते. यावेळी खाण्यासाठी काहीच नसल्याने उपाशीपोटी असलेले विद्यार्थी वारंवार सुरू असलेल्या क्षेपणास्त्राच्या माऱ्याने घाबरले होते. ४० भारतीय विद्यार्थी तीन दिवसानंतर वाहतूक कोंडीतून बाहेर निघाल्यानंतर ते सर्व भारतीय विद्यार्थी महाविद्यालयाच्या वसतिगृहात परत गेले. परत जात असतानाही अनेक ठिकाणी बॉम्बवर्षाव सुरूच होता.

४० भारतीय विद्यार्थी मुंबईत आले

दूतावासाशी पुन्हा संपर्क झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना रुमानियात नेण्यात आले. तेथून सर्व ४० भारतीय विद्यार्थी दुपारी चार वाजता विमानात बसून रात्री दोन वाजता मुंबईत आले. सौरभही या विमानाने मुंबईत येऊन रात्री आठ वाजता मिरजेत आला. मिरज रेल्वेस्थानकात काका अनिल इसापुरे यांनी मिठी मारून पुतण्याचे स्वागत केले.

Web Title: Saurabh Vijay Isapure from Miraj shared his experience in Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.