कुपवाड : विविध संतांनी शेतकऱ्यांचे दाखले देत समाजप्रबोधनाचे काम केले. त्यापैकी संत सावता माळी यांच्या नावाने लवकरच राज्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व नावीन्यपूर्ण अशी कृषी योजना राबविता येईल, असे सुतोवाच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. येथील अखिल भारतीय वीरशैव माळी समाजोन्नती परिषदेच्यावतीने नरवाडचे प्रगतशील शेतकरी मारूती कृष्णा माळी यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. खासदार संजय पाटील, माजी आमदार प्रा. शरद पाटील प्रमुख उपस्थित होते. सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, राज्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबांच्या नावाने स्वच्छता अभियानाचा स्तुत्य असा उपक्रम राबविला. त्याच धर्तीवर संत सावता माळी यांच्या नावाने राज्यात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर अशी योजना लवकरच राबविता येईल. सध्या अधिवेशन सुरू असल्याने त्याची घोषणा करता येणार नाही. याबरोबरच येणाऱ्या काळात राज्यातील कृषी विभागाचा आढावा घेणार आहे. खासदार राजू शेट्टी म्हणाले की, चळवळीने शेतकऱ्यांसाठी दबावगट निर्माण केला. त्याच मार्गाने चाललो आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊंनी शेतकऱ्यांच्या हिताचे जास्तीत जास्त निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याबरोबरच प्रा. शरद पाटील, सांगली मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष के. एस. भंडारे, समाजभूषण मारूती माळी यांचीही भाषणे झाली. माजी महापौर विजयराव धुळूबुळू यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. द्राक्षगुरू वसंतराव माळी यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. उद्योजक रंगराव इरळे यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रमास वीरशैव माळी समाजोन्नती परिषदेचे आनंदराव माळी, अण्णासाहेब माळी, यशवंत कानडे, तुकाराम माळी, जोतिबा कारंडे, गणपती माळी, रामचंद्र माळी आदी उपस्थित होते. मान्यवरांचा गौरव कार्यक्रमात विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या मान्यवरांना गौरविण्यात आले. यामध्ये न्यायाधीशपदी नियुक्तीबद्दल अर्चना बरगाले, अर्चना जतकर यांचा आणि पीएच. डी. मिळाल्याबद्दल प्रा. एम. डी. हनमाणे यांचा सत्कार करण्यात आला.
सावता माळी कृषी योजना राबविणार
By admin | Published: August 01, 2016 12:23 AM