तासगाव : सावळज (ता. जत) येथे बेकायदा स्फोटकांचा साठा केल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी बुधवारी छापा टाकला. यात ५८७ जिलेटिन कांड्या, ४४७ डिटोनेटर्स व एक ट्रॅक्टर असा ३ लाख १२ हजार १४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रतनलाल लालुराम गुजर व शंकरलाल लालुराम गुजर (रा. राजस्थान) या दोघांना ताब्यात घेतले, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर व पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अशोक बनकर म्हणाले, सावळज येथे रतनलाल लालुराम गुजर हा सावळज ते डोंगरसोनी रस्त्यालगत असणाºया एका खोलीत जिलेटिन कांड्या व त्याचा ट्रॅक्टर (क्र. आरजे ०६, आय. आर. १२१७) बेकायदेशीर बाळगून असल्याची बातमी मिळाली. याआधारे बुधवारी दुपारी छापा टाकला. त्यावेळी त्याच्याकडून विविध कंपनीच्या ६४४४ रुपये किमतीच्या ५८७ जिलेटिनच्या कांड्या व ४४७० रुपये किमतीचे ४४७ डिटोनेटर्स असा ३ लाख १२ हजार १४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले, पोलीस हेड कॉन्स्टेबल काका रुपनर, पोलीस नाईक, रमेश चव्हाण, दरिबा बंडगर, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ गुंडे, विनोद सकटे, सतीश खोत, अशोक सूर्यवंशी, महेश निकम, विजय पाटील यांनी सहभाग घेतला.