कुकटोळी येथे १५ एप्रिल रोजी शुभम कारंडे यांच्या पोल्ट्रीमध्ये दुर्मीळ खवले मांजर आढळून आले. वन विभागाच्या बेफिकिरीमुळे हे मांजर १६ एप्रिलच्या पहाटेपर्यंत गायब झाले होते. परंतु या कारंडे वस्तीच्या परिसरामध्ये या मांजराची तस्करी झाल्याची चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू होती. ज्या दिवशी मांजर आढळून आले, त्या दिवशी गावातील एक युवक रात्री उशिरापर्यंत कारंडे कुटुंबीयांना हे मांजर सोडून द्या, असे सांगत होता व रात्री एकपर्यंत पोल्ट्रीभोवती घिरट्या घालत होता. यामुळे या युवकानेच खवल्या मांजराची तस्करी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गुरुवारी तब्बल महिन्यानंतर ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकल्याने, दोन वनाधिकारी या संशयित युवकासोबत कारंडे वस्तीवर आले. खवल्या मांजर कसे पळून गेले, याची ‘कथा’ उपस्थितांसमोर सांगू लागले. यावेळी शुभम कारंडे यांना हे प्रकरण मिटवून घ्या, मांजर पळून गेले आहे, असे सांगा अशी विनंती संशयित युवक करू लागला. वस्तीवरील काही नागरिकांनी खडे बोल सुनावताच आलेल्या वनाधिकाऱ्यांसहित त्याने तिथून काढता पाय घेतला.
तब्बल महिन्यानंतर येऊन वनाधिकाऱ्यांनी सारवासारव केल्याने या मांजराची तस्करी झाल्याचा संशय बळवला आहे.
येत्या दोन दिवसांत कवठेमहांकाळ येथील वन्यजीवप्रेमी संघटना व काही सामाजिक संघटना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना भेटून संबंधित वनाधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करणार आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख यांना भेटून संशयिताला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात येणार आहे.