अविनाश कोळी- सांगली --धर्म, जात, प्रांत, भाषा, सीमा यांच्या पलीकडे जाऊन सांगलीच्या लाल मातीने पाऊण शतकाहून अधिक काळ राष्ट्रीय एकात्मता जपली आहे. पंजाब, हरियाणा, कर्नाटक, गुजरात अशा अनेक प्रांतातील पैलवानांना सांगलीच्या मातीने स्वत:च्या मुलांप्रमाणे घडविले आणि यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. धार्मिक, प्रांतिक भेदभाव न करता सांगलीच्या मल्लविद्येने राष्ट्रहिताला पोषक अशी चळवळ उभारली. पैलवान हरी नाना पवार यांच्या विद्यार्थीदशेपासूनच एकात्मतेचा दरवळ सुरू झाला होता. शिवरामपंत पटवर्धनांबरोबरच चांदसाहेब शिकलगार यांच्यासारख्या मुस्लिम वस्तादांनी त्यांना पैलू पाडण्यास सुरुवात केली. उमेदीच्या काळात हरी नाना पवार यांचा सकाळचा नाष्टा वस्तादांच्या घरी असायचा. त्यावेळी ते मुस्लिम कुटुंबीय पवारांवर घरच्या लोकांहून अधिक प्रेम करायचे. पवारांच्या विजयासाठी मुस्लिम महिला नवस बोलायच्या. मल्लविद्येला आलेली राष्ट्रीय एकात्मतेची ही परिपक्वता जवळपास ऐंशी ते नव्वद दशकांची आहे. सांगलीची आद्य बजरंग तालीम हाच एकात्मतेचा मंत्र जपत आजवर वाटचाल करीत आहे. मल्लविद्या शिकायला येणारी व्यक्ती कोणत्या प्रांताची, कोणत्या धर्माची, कोणत्या जातीची, कोणती भाषा बोलणारी आहे, याचा विचारच केला जात नसे. विद्येविषयीची आस्था आणि पात्रता या निकषावर याठिकाणी प्रवेश दिला जात असे. पूर्वीपासून पंजाब, हरियाणा, कर्नाटक, इंदौर या ठिकाणाहून मल्ल सांगलीत शिकायला येत आहेत. पूर्वीच्या काळी ठाकूर सिंग, गुत्ता सिंग, सहदेव धारवाडी अशा अनेक मल्लांनी सांगलीचे प्रेम अनुभवले. अलीकडच्या काळात हरियाणाहून आलेला जगदीश कालिरमण, इंदोरचे राकेश पटेल, रोहित पटेल, पंजाबचा गोल्डनसिंग, दिलीपसिंग या पैलवानांना सांगलीच्या मातीने विद्यादान करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविले. आजही पवारांच्या तालमीत कर्नाटकचे अनेक पैलवान मल्लविद्येचे शिक्षण घेत आहेत. शेकडो वर्षांच्या मल्लविद्येच्या परंपरेने जात, धर्म आणि प्रांतापलीकडे जाऊन एकात्मतेचा संदेश देशभर दिला. जिल्ह्यातील एकात्मतेचे रंगमिरजेतील प्रसिद्ध मीरासाहेब दर्ग्यातील गलेफाचा मान शेकडो वर्षांपासून चर्मकार समाजाकडेमिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाच्या आयोजकांमध्ये मुस्लिम समाजाचा पुढाकारसांगली, मिरजेतील मुस्लिम समाजाकडून दरवर्षी एकात्मतेची शिवजयंती कडेगावच्या मोहरमची परंपरा ब्राह्मण समाजाने सुरू केली. दीडशे वर्षांची ही परंपरा आहे. तेथील निम्मे ताबूत हिंदूंचे असतात.गोटखिंडी (ता. वाळवा) येथे मशिदीमध्ये ३५ वर्षांपासून दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरानांद्रे येथील राम-रहीम नवरात्रोत्सव मंडळात ९0 टक्के मुस्लिम कार्यकर्ते इस्लामपुरात संभूआप्पा-बुवाफन उरूसात हिंदू-मुस्लिमांचा सहभागमालगाव (ता. मिरज) येथील बुवाफन उरूस आयोजनात हिंदूंचा सहभागजिल्ह्यातील हळद, कुंकू तयार करण्याची परंपरा अत्तार या मुस्लिम कुटुंबाकडे अनेक वर्षांपासून आहे. गायकीची घराणी असतात, त्याप्रमाणे कुस्तीचे सांगलीचे हे घराणे आहे. अनेक प्रांतांचे, जाती-धर्माचे लोक याठिकाणी येऊन शिकून गेले. आजसुद्धा ही परंपरा सुरू आहे. त्यामुळे खेळाच्या माध्यमातून सांगलीने राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र जपला आहे, हे निश्चित. - गौतम पवार, नगरसेवक, सांगली
सांगलीच्या लाल मातीला राष्ट्रीय एकात्मतेचा गंध
By admin | Published: October 19, 2015 11:10 PM