कवठेमहांकाळ: कवठेमहांकाळ येथील आनंद सागर शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी मिनी बस काल, मंगळवारी सकाळी रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर लांडगेवाडी (नरसिंहगाव) जवळ उलटली. या अपघातात सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले. तर अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली. विभावरी विनायक पोतदार, विकास विनायक पोतदार, ऋग्वेद चव्हाण, सान्वी अभिजीत सगरे, समृद्धी सावंता माळी, अनन्या प्रदीप पवार अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. कवठेमहांकाळ पोलिसांनी अपघाताची दखल गांभीर्याने घेतली असून, शाळा व्यवस्थापनावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. बसचा चालकाला डोळे आले होते तरी देखील तो कामावर आल्यामुळे हा अपघात घडला.कवठेमहांकाळ येथे आनंद सागर पब्लिक स्कूल आहे. काल, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी लवकर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस क्रमांक MH-12-FC-9113 रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर, लांडगेवाडी जवळ उलटली. यावेळी घटनास्थळावरील नागरिकांनी व वाहनधारकांनी जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जखमी विद्यार्थ्यांचेवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. बस चालकाची अवस्था अत्यंत बिकट आहे. आरटीओ व पोलिसांची कोणतीही परवानगी नसताना देखील विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी बेकायदेशीरपणे वाहने वापरली जात आहेत. अशी वाहने वापरणाऱ्या संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पालक व नागरिक करीत आहेत.
Sangli News: लांडगेवाडी येथे शाळेची बस उलटली, सहा विद्यार्थी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 1:24 PM