विटा : विटा येथील आदर्श पब्लिक स्कूलच्या बसला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत बस जळून खाक झाली. शाळेच्या लहान मुलांना घरी सोडून विट्याकडे बस परत येत असताना हा प्रकार घडला. बसमध्ये मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला.दरम्यान, बसचा चालक व महिला मदतनीस हे प्रसंगावधान राखून बसमधून बाहेर पडल्याने दोघेही बचावले. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विटा ते खानापूर रस्त्यावर सुळेवाडी (रेवानगर) स्वागत कमानीजवळ घडली.येथील आदर्श पब्लिक स्कूलची बस (क्र. एमएच-१०-के-९२२६) शाळा सुटल्यानंतर सुमारे २५ ते ३० मुलांना घेऊन आली होती. विटा शहरातील मुलांना घरी सोडल्यानंतर बस खानापूर रस्त्यावरील सुळेवाडी उपनगराकडे गेली. त्यावेळी स्वागत कमानीजवळ असलेल्या घरात बसमधील शेवटच्या मुलाला सोडल्यानंतर बस विट्याकडे परत येत होती.
त्यावेळी बसच्या पुढील इंजिनमधून धूर येत असल्याचे चालक सदाशिव पवार यांच्या लक्षात आले. त्यांनी महिला मदतनीस अरूणा घोडके यांना तात्काळ बसमधून खाली उतरण्यास सांगितले. दोघेही बसमधून खाली उतरून दूर जाऊन थांबले. काही क्षणातच बसने पूर्णपणे पेट घेतला.या घटनेची माहिती विटा नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन विभागाने घटनास्थळी जाऊन तब्बल तासाच्या प्रयत्नानंतर बसला लागलेली आग आटोक्यात आणली. तोपर्यंत बस पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.
या घटनेनंतर आदर्श शिक्षण संकुलाने, बसमध्ये मुले नव्हती, रिकाम्या बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असून चालक व महिला मदतनीस सुखरूप आहेत, त्यामुळे अफवांवर पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले.