सांगली : जिल्हा परिषदशाळांतील पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार आहेत. यापैकी एक गणवेश पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीने खरेदी करायचे असून त्यासाठीचे अनुदान वर्ग करण्यात येणार आहे. दुसऱ्या गणवेशाचे कापड शासन खरेदी करून देणार असून, शाळा व्यवस्थापन समिती त्यातून गणवेश शिवून घेणार आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवीच्या ३ लाख ४५ हजार १४२ विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहेत. पूर्वी शासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाच गणवेश मिळत होता. या वर्षीपासून शासनाने सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन गणवेशांचे पैसे शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीला दिले जात होते.परंतु, आगामी शैक्षणिक वर्षापासून एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती आणि दुसरा गणवेश राज्य सरकार देईल. पूर्वीप्रमाणेच एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती खरेदी करून विद्यार्थ्यांना देणार आहे. दुसऱ्या गणवेशासाठी राज्य सरकार शाळा व्यवस्थापन समितीला कापड उपलब्ध करून देईल. नंतर शाळा व्यवस्थापन समिती हे कापड महिला बचत गटांकडून किंवा स्थानिक पातळीवर शिवून घेईल. यासाठीचा खर्च राज्य सरकार समितीला देणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
पहिली ते आठवीची विद्यार्थी संख्यावर्ग - विद्यार्थी संख्यापहिली - २९,५२८दुसरी - ४२,६२७तिसरी - ४३,६५८चौथी - ४३,६१५पाचवी - ४४,४८३सहावी - ४३,५३६सातवी - ४३,६०२आठवी - ४४,०९५एकूण - ३,४५,१४२
राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहेत. यापैकी एक गणवेश पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती खरेदी करणार आहे. दुसऱ्या गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीला शासनाकडून दिले जाणार आहे. -मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.
कपड्याचा रंग आणि दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहेत. शैक्षणिक वर्षाच्या अगदी तोंडावर नियोजन न करता घाईने घेतलेल्या निर्णयामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळेल का, हा प्रश्न आहे. वितरणाचा बट्ट्याबोळ होण्यापेक्षा यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर गणवेश घेऊन पुढील वर्षी शासन स्तरावरून गणवेश पुरवठा करण्याचे नियोजन करावे. -अविनाश गुरव, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती.