विटा : विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या चैतन्य सचिन वायदंडे (वय ९, रा. विटा) शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास विटा येथील जुना वासुंबे रस्त्यावरील हजारे मळा येथे घडली.
विटा येथील चैतन्य वायदंडे हा कुटुंबीयांसमवेत हजारे मळा येथे राहण्यास होता. त्याचे वडील यंत्रमाग कामगार आहेत. तो चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होता; परंतु कोरोनामुळे शाळा बंद असल्याने तो घरीच होता. गुरुवारी दुपारी तो जुना वासुंबे रस्त्यावरील हजारे मळा येथे असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी गेला होता.
परंतु त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार आसपासच्या लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याचा मृतदेह सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्याला तातडीने विटा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.
त्यानंतर तेथून त्याला ग्रामीण रुग्णालयात पाठविले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून पोलीस उपनिरीक्षक पी. के. कन्हेरे पुढील तपास करीत आहेत.