लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये पंधरा दिवसांसाठी बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी सूचना आमदार मानसिंगराव नाईक यांनी तहसीलदारांसह प्रशासनास दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालयात गुरुवारी आढावा बैठक झाली. यावेळी आ. नाईक बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक जमाल मोमीन, शिराळा नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, शिराळा आगारप्रमुख विद्याताई कदम, उपअभियंता अतुल केकरे, कोकरूड ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. इनामदार, गटशिक्षण अधिकारी प्रदीप कुडाळकर, नायब तहसीलदार सचिन कोकाटे आदी उपस्थित होते.
आ. नाईक पुढे म्हणाले, बाजार पूर्णपणे बंद न ठेवता शहरातील वेगळ्या ठिकाणी सामाजिक अंतर राखून बसण्याची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून ठेवावा, शिराळा उपजिल्हा रुग्णालय व कोकरूड ग्रामीण रुग्णालय येथील ऑक्सिजन टाक्या भरून ठेवाव्यात. बेड व्यवस्था करून घ्यावी. एसटी बस सेवा सुरू ठेवत असताना, पुरेशी काळजी घेऊन विनामास्क कोणालाही बसमध्ये प्रवेश देऊ नये, शिवाय गर्दीवर नियंत्रणासाठी बसस्थानक परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करावेत. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने आपापली जबाबदारी चोख पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.