इस्लामपूर : व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्यरत सलाम मुंबई फौंडेशन ही संस्था सांगली जिल्ह्यात ‘तंबाखूमुक्त शाळा’ मोहीम राबवित असून, या मोहिमेत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान’च्या पुढाकाराने वाळवा तालुक्याने आघाडी घेतली आहे. काही महिन्यात तालुक्यातील प्राथमिक शाळा व विद्यालये तंबाखूमुक्त होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.चार वर्षांपूर्वी या अभियानाला सलाम मुंबई फौंडेशन व सक्सेरिया ट्रस्टचा पाच लाखांचा व्यसनमुक्ती पुरस्कार मिळाला आहे़ तेव्हापासून अभियान व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातही काम करीत आहे़ अभियान व फौंडेशन संयुक्तपणे वाळवा तालुक्यात ‘तंबाखूमुक्त शाळा’ मोहीम राबवित आहेत़ या मोहिमेत पंचायत समितीचे सभापती रवींद्र बर्डे, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, सौ़ नीशादेवी वाघमोडे, सौ़ छाया माळी यांचे सहकार्य मिळत आहे. जानेवारीत पंचायत समितीमध्ये सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते़ तालुक्यातील २४६ शाळा व हायस्कूल्सपैकी १६८ शाळांनी तंबाखू मुक्तीचे ११ निकष पूर्ण करून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अभियानकडे प्रस्ताव दिले आहेत. फौंडेशनचे संजय ठाणगे, अभियानचे लक्ष्मण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून पहिल्या टप्प्यात १५ गावांतील ३0 शाळांना भेटी दिल्या आहेत़ यामध्ये बहाद्दूरवाडी, भडकंबे, ढवळी, बावची, नेर्ले, पेठ, इस्लामपूर, कासेगाव आदी गावांतील शाळांचा समावेश आहे़ या मोहिमेत फौंडेशनचे दीपक भोसले,अभियानचे संघटक इलियास पिरजादे, कुमार पाटील, प्रसाद शेळके, किरण खोत, दीपक चव्हाण यांनीही परिश्रम घेतले़ येत्या काही दिवसात उर्वरित शाळांनाही भेटी दिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)प्रतिसादच नाहीफौंडेशनचे संजय ठाणगे म्हणाले, वाळवा तालुक्याने ‘तंबाखूमुक्त शाळा’मध्ये आघाडी घेतली आहे. जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानचे यामध्ये योगदान आहे़ वाळव्यातून १६८, तर शिराळ्यातून २, पलूसमधून १, कडेगावमधून २ प्रस्ताव आलेले आहेत़ जिल्ह्यातील इतर तालुक्यातून थंडा प्रतिसाद मिळत असताना, वाळव्यातून मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काही महिन्यात वाळवा तालुका तंबाखूमुक्त होऊ शकतो.
वाळव्यातील शाळा होणार तंबाखूमुक्त
By admin | Published: May 06, 2016 11:11 PM