सांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी दि. २४ मार्चअखेर ८१ लाख ६४ हजार ६६६ टन उसाचे गाळप करून ९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून, १२.३६ टक्के साखर उतारा मिळाला आहे. यावर्षी एक कोटी क्विंटलच्या पुढे साखरेचे उत्पादन होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. येत्या चार दिवसात उर्वरित कारखान्यांचे गळीत हंगाम बंद होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी २४ एप्रिल २०१४ अखेरच्या गळीत हंगामात ७१ लाख ६१ हजार ३५९ टन उसाचे गाळप करून ८८ लाख १३ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. त्यावेळी १२़.३१ टक्के सरासरी साखरेचा उतारा मिळाला होता. मागील पाच वर्षात साखर कारखानदारांनी आधुनिकता आणून गाळप क्षमता वाढविली आहे. २४ मार्च २०१९ अखेरपर्यंत जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी ८१ लाख ६४ हजार ६६६ टन उसाचे गाळप करून ९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. उसाचा सरासरी १२.३६ टक्के उतारा आहे.
चार कारखान्यांचे गळीत हंगाम चालू आहेत. या महिन्याच्या कालावधित ऊस गाळपाची आकडेवारी ८३ लाख टनापर्यंत जाणार आहे. साखरेचेही जिल्ह्यात विक्रमी उत्पादन होणार आहे. प्रथमच एक कोटी क्विंटल साखरेचा टप्पा निश्चित पार होणार आहे. साखरेची आकडेवारी लक्षात घेऊन कारखानदारांना साखर विक्रीचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात जादा साखरेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.बंद झालेले : कारखानेविश्वासराव नाईक (चिखली, ता. शिराळा), हुतात्मा (वाळवा), माणगंगा (आटपाडी), महांकाली (कवठेमहांकाळ), राजारामबापू, वाटेगाव युनिट, सोनहिरा (वांगी, ता. कडेगाव), क्रांती (कुंडल, ता. पलूस), सर्वोदय (कारंदवाडी, ता. वाळवा), मोहनराव शिंदे (आरग, ता. मिरज), यशवंत शुगर (नागेवाडी, ता. खानापूर), उदगिरी शुगर (बामणी-पारे, ता. खानापूर), सद्गुरू श्री श्री शुगर (राजेवाडी, ता. आटपाडी) या कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. उर्वरित कारखान्यांचे गळीत चार दिवसात बंद होणार आहे.