सांगली : जिल्हा परिषदेतील लिपिक वसंत लांगे यांना पशुसंवर्धन समितीच्या सभापती मनीषा पाटील यांचे पती तानाजी पाटील यांनी दमदाटी केल्याप्रकरणी शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. यासंदर्भात आ. जयंत पाटील, आ. अनिल बाबर यांनी सायंकाळी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांकडून यापुढे कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही, अशी ग्वाही आमदारांनी दिल्यानंतर संप स्थगित करण्यात आला. कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी तानाजी पाटील यांनी माफी मागावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन पुकारले. या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला अधिकाऱ्यांनीही काळ्या फिती लावून पाठिंबा दिला आहे. आंदोलनामध्ये कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सुभाष मरीगुद्दे, एस. आर. पाटील, दादासाहेब पाटील, पी. ई. जगताप, नीलकंठ पट्टणशेट्टी, एस. एन. वीर, अशोक पाटील, म्हळाप्पा गळवी आदी सहभागी झाले होते.सायंकाळी आ. जयंत पाटील, आ. अनिल बाबर यांनी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बैठक बोलावली. अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करावे. पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी कामकाजात हस्तक्षेप करु नये यासाठी सर्वांना सूचना देणे, कर्मचाऱ्यांनी आपली कामे चोख ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेमधील वादावर पडदा
By admin | Published: June 26, 2015 11:49 PM