विटा : चक्रीवादळामुळे आज (रविवारी) दुपारी विटा येथील कार्वे औद्योगिक वसाहतीत असणार्या लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नुकसान झाले. महाविद्यालय व ग्रंथालय इमारतीच्या काचा फुटल्या, तसेच ग्रंथालयातील किमती पुस्तके व साहित्याचे मोठे नुकसान झाले. वसतिगृह इमारत व संरक्षण भिंतीचीही पडझड झाली. यात २0 ते २५ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. विटा-तासगाव रस्त्यावर अभियांत्रिकी शैक्षणिक संकुल आहे. या संकुलात डिग्री व डिप्लोमा महाविद्यालये आहेत. ग्रंथालय व बाजूला मुला-मुलींचे वसतिगृह आहे. आज दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक चक्रीवादळ सुरू झाले. या वार्याचा वेग इतका मोठा होता की, इमारतीच्या दर्शनी भागावर असलेली काचेची अखंड आच्छादने उडून बाजूला पडली. तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वसतिगृह इमारतीचे या चक्रीवादळाने नुकसान झाले. आज, रविवार सुट्टी असल्याने संकुलात विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच आदर्श संकुलाचे अध्यक्ष वैभव पाटील, प्रशासकीय अधिकारी सुभाष धनवडे यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेनंतर गावकामगार तलाठी व अन्य महसूलच्या कर्मचार्यांनी पंचनामे सुरू केले. या चक्रीवादळाने सुमारे २० ते २५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
विट्यात चक्रीवादळाचा तडाखा अभियांत्रिकी महाविद्यालयात पडझड : २0 ते २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज
By admin | Published: May 19, 2014 12:17 AM