सांगली : आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान ईदच्या खरेदीला बाजारात गर्दी होत आहे. शनिवार बाजारात लहान मुलांच्या कपडे खरेदीसाठी झुंबड उडाली होती. ईदच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित होणाऱ्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातील कुर्ता व लहान मुलींसाठी असणाऱ्या ‘अलिया’ ड्रेसची यंदाच्या ईदमध्ये ‘क्रेझ’ असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. सुक्या मेव्याचे दर मात्र यंदा स्थिर राहिल्याने दिलासा मिळाला आहे. लहान मुलांच्या कपडे खरेदीसाठी येथील मित्रमंडळ चौकात शनिवारी सकाळपासूनच झुंबड उडाली होती. याठिकाणी अगदी तीनशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत कपडे उपलब्ध होते. यावर्षीही ईदच्या कपड्यांवर मालिका, चित्रपटांचा प्रभाव दिसून येत आहे. ‘बजरंगी भाईजान’चित्रपटातील कुर्ता बाजारात आला असून, याची किंमत तीनशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत आहे. याला चांगली मागणी आहे. ‘अलिया ड्रेस’ लहान मुलींमध्ये लोकप्रिय झाला आहे. तरुणींसाठी अनेक फॅशनेबल चुडीदार बाजारात आले आहेत. यामध्ये दावत ए इश्क, मधुबाला, हँगओव्हर, कराची पॅटर्न आदींना चांगली मागणी असल्याची माहिती विक्रेते विक्रांत किल्लेदार यांनी दिली. साड्यांमध्ये कुंकुम्भाग्य, देवयानी आदी मालिकांमधील साड्यांना मागणी आहे. यावर्षीही चेन्नई एक्स्प्रेस, भागलपुरी साड्यांना चांगली मागणी आहे. तरुणांसाठी कार्गो स्टाईलच्या जीन्स् पँटना पसंती आहे. त्याचबरोबर पेन्सील बॉटम, बलून पॅँटलाही तरुणाईची पसंती दिसत आहे. चुडीदारच्या किमती हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत आहेत. यावर्षी कपडे व सुक्या मेव्याचे दर गतवर्षीच्या तुलनेत स्थिर राहिल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती विक्रेते वसीम तांबोळी यांनी दिली. (प्रतिनिधी)
ईदच्या खरेदीसाठी झुंबड
By admin | Published: July 12, 2015 12:43 AM