सांगली : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने बुधवारी बापट मळा येथील नॅचरोपॅथी रुग्णालय सील केले. या रुग्णालयाची महापालिकेकडे नोंदणी नसून, तेथे उपचार करणाऱ्यांना डॉक्टर ही पदवी लावता येत नाही. पात्र नसतानाही त्यांनी डॉक्टर पदवी लावून, त्याची जाहिरात करून रुग्णांची फसवणूक केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे डॉ. संजय कवठेकर यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालये, ओपीडी रुग्णालये व सोनोग्राफी केंद्रे तपासण्याचे आदेश आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी दिले आहेत. त्यानुसार आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्या पथकाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या महिन्यात कुपवाड उल्हासनगर, भारत सूतगिरणी आदी परिसरातील तीन रुग्णालये सील केली होती. बुधवारी आरोग्य विभागाचे डॉ. संजय कवठेकर, अन्न व औषध प्रशासनचे सावंत, महापालिकेचे औषध निर्माता अष्टेकर आदींच्या पथकाने बापट मळा परिसरात सुरू असलेल्या टच अॅण्ड केअर वेलनेस ट्रीटमेंट सेंटर या नॅचरोपॅथी रुग्णालयावर छापा टाकला. पथकाने रुग्णालयातील कागदपत्रांची तपासणी केली. या केंद्र चालकाने बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार महापालिकेकडे नोंदणी केलेली नाही. रुग्णालयात तिघेजण डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वत:च्या नावासमोर डॉक्टर ही पदवी लावली आहे. वास्तविक वैद्यकीय कायद्यानुसार अॅलोपॅथी, आॅर्थोपेडिक यांनाच डॉक्टर पदवी लावता येते. नॅचरोपॅथी उपचार करणाऱ्यांना डॉक्टर पदवी लावता येत नाही. पात्र नसतानाही डॉक्टर पदवी लावून त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. शिवाय जाहिरातबाजी करून रुग्णांची फसवणूकही केल्याने या रुग्णालयावर कारवाई करून सील ठोकण्यात आल्याचे डॉ. कवठेकर यांनी सांगितले. या तीन डॉक्टरांविरूद्ध पोलिसांतही तक्रार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
महापालिकेकडून नॅचरोपॅथी केंद्राला सील
By admin | Published: April 20, 2017 10:57 PM